घरताज्या घडामोडीसराफ व्यावसायिक हत्येप्रकरणी अधिवेशनात जाब विचारणार : चित्रा वाघ

सराफ व्यावसायिक हत्येप्रकरणी अधिवेशनात जाब विचारणार : चित्रा वाघ

Subscribe

सराफ व्यावसायिक विजय बिरारी हे गुन्हेगार पार्श्वभूमीचे नव्हे व्यापारी होते. त्यांची आत्महत्या नसून सायराबाद पोलिसांनी हत्या केली आहे. त्यामुळे सायराबाद पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बिरारींना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवू. बिरारी यांच्या मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन जाब विचारणार असल्याची माहिती भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सराफ असोसिएशन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

विजय बिरारी मृत्यूप्रकरणी शुक्रवारी चित्रा वाघ यांनी नाशिकमध्ये बिरारी कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. दोषींवर कारवाई होण्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी कुटुंबियांना सांगितले.

वाघ म्हणाल्या, बिरारी यांची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचे पुरावे समोर आले आहेत. याप्रकरणी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी देवरे यांच्याशी चर्चा केली आहे. बिरारींचा मृत्यू झाल्याचे समजताच नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी आधीच दोन पोलीस अधिकारी व कॅन्टीनमधील कर्मचारी उपस्थित होते. कायद्यानुसार त्यांच्यामार्फत फिर्याद दाखल करणे गरजेचे असताना नाशिक पोलिसांनी सायबराबाद पोलिसांमार्फत फिर्याद दाखल केली आहे. बिरारी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंत्यविधीवेळी बिरारी यांना कुटुंबियांनी पाहिले असता त्यांचा कान तुटलेला दिसला, अंगावर मारहाण केल्याची चिन्हे होती. तसेच, त्यांच्या हातात सळई घुसवल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, उपाध्यक्ष मेहुल थोरात, सेक्रेटरी गिरीश नवसे, राजेंद्र दिंडोरकर, सुनील महालकर, राजेंद्र कुलथे, कृष्णा नागरे, संजय दंडगव्हाळ उपस्थित होते.

- Advertisement -

सराफांच्या अडचणीत भर

गुन्हेगाराला अटक केल्यानंतर तपासात तो ज्या सराफ व्यावसायिकाचे नाव सांगेल, त्याच्यावर विश्वास ठेवून पोलीस सराफास ताब्यात घेत आहेत. पोलिसांचा ससेमिरी नको असल्याने तिसरी पिढी सराफ व्यवसायात येण्यास धजावत नाही. गुन्ह्यासंदर्भात सराफ व्यावसायिकाकडे तपास करताना प्रथम रिकव्हरी अधिकारी व त्यानंतर तपासी अधिकार्‍याकडून तपास होणे आवश्यक आहे. मात्र, पोलिसांकडून प्रारंभीच तपासी अधिकारी सराफाकडे येतात. त्यामुळे सराफांच्या अडचणी वाढत आहेत, असे पदाधिकारी कृष्णा नागरे यांनी सांगितले.

- Advertisement -

तीन वर्षात पोलिसांची एकही बैठक नाही

सुवर्ण व्यवसायात सध्या अडचणीतून जात आहे. आयपीसी ४११ हा कायदा जाचक असून त्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. सराफ व्यावसायिक व पोलिसांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, तीन वर्षांपासून बैठकच घेण्यात आलेली नाही. याप्रकरणी पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आठ दिवसात बैठक घेण्यात येईल, असे पदाधिकार्‍यांना सांगितले आहे. जोपर्यंत कुणाचा बळी जात नाही तोपर्यंत प्रशासन व शासनाला जाग येत नाही. आणखी सराफ व्यावसायिकांचा बळी जावू नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.

चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेले मुद्दे

* नाशिक पोलिसांनी सायराबाद पोलिसांना फिर्यादी का केले
* बिरारींच्या अटकेची नोंद पंचवटी पोलीस ठाण्यात दुसर्‍या दिवशी का करण्यात आली
* बिरारींना २४ तासांपेक्षा अधिक वेळ शासकीय विश्रामगृहात का ठेवले होते
* सोने व बिलांची मोजणी झाली असताना सायराबाद पोलिसांनी बिरारींना अटक का केली
* सायराबाद पोलिसांनी स्थानिक पोलिसांना माहिती का दिली नाही
* स्नायूंवर शस्त्रक्रिया झाल्याने बिरारी नीट चालूही शकत नव्हते. मग उडी कशी मारतील
* बिरारींचा पोलिसांनी छळ केला असून, त्यांनीच बिरारींना बाल्कनीतून ढकलले आहे
* कुटुंबिय मदतीसाठी पंचवटी पोलिसांकडे आले असताना उडवाउडवी उत्तरे का देण्यात आली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -