प्रेमाचा त्रिकोण; प्रेयसीचा फोटो, जन्मतारीख गोंदवून घेत पत्नीचा छळ

पतीने प्रियसीचा फोटो फेसबुक प्रोफाईलवर अपलोड करत, स्वत:च्या शरीरावर प्रियसीचा फोटो, जन्मतारीख गोंदवून घेत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पीडितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फडोळमळा, डी. जी. नगर, सिडको येथील संशयित पती नितीन सुहास घेगडमल, सासू सुहास घेगडमल, सासरे शारदा सुहास घेगडमल, नणंद शितल सुहास घेगडमल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता सासरी नांदत असताना पतीचे विविध मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले. याप्रकरणी विवाहितेने पतीला विचारणा केली असता पतीसह सासरच्यांनी कोणाशीही अनैतिक संबंध नसल्याचे भासवले. सई नावाच्या मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवून फेसबुक प्रोफाईलवर दोघांचे फोटो अपलोड केले. ही बाब विवाहितेला समजली. तसेच पतीने शरीरावर सईचा फोटो, जन्मतारीख गोंदवून घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यातून पतीने फसवणूक केल्याचे तिच्या लक्षात आले. त्यातून सासरच्यांनी १ मे २०१७ ते १३ ऑगस्ट २०२० या कालावधीत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. पतीच्या चुकांवर पांघरुन घालत सासू, सासरे व नणंदने पतीला दोन महिन्यांसाठी मुंबईला पाठवून दिले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला अपमानास्पद वागणूक दिली. तू माझ्या मुलास समजून घेत नाही. तू त्याला सुख देवू शकत नाही, असे म्हणत तिला दोन दिवस उपाशीपोटी ठेवले. पुढील तपास पोलीस हवालदार उजागरे करत आहेत.