नाशकातील खासगी हॉस्पिटलचा टर्नओव्हर ३९ दिवसांत ४६ कोटी

स्थायीच्या बैठकीत सुधाकर बडगुजर यांचा धक्कादायक दावा; रुग्णांच्या लुटीचा सदस्यांनी वाचला पाढा

कोरोनामुळे दररोज हजारो नागरिक बाधित होत असताना आणि मृत्यूमुखी पडणार्‍यांचीही संख्या वाढलेली असताना महापालिकेचा आरोग्य विभाग हातावर हात धरुन बसला असल्याचा आरोप मंगळवारी (दि. ८) झालेल्या स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेत सदस्यांनी केला. महापालिकेच्या अनागोंदीचा फायदा घेत खासगी हॉस्पिटल्सने अक्षरश: धंदा मांडला असून शहरातील एका खासगी हॉस्पिटलमधील अवघ्या ३९ दिवसांची उलाढाल ही तब्बल ४६ कोटी झाल्याचा गंभीर दावा ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केला.
सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या सभेतबिटको रुग्णालयात कोरोना रुग्णालयासाठी लागणार्‍या साहित्याचा ठराव कार्योत्तर मंजूरीसाठी ठेवण्यात आला होता. या अनुषंगाने सदस्यांनी प्रशासनाला फैलावर घेत अनागोंदी कारभाराचा समाचार घेतला. शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असतानाही गेल्या सहा महिन्यांपासून ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप यावेळी सदस्यांनी केला. लोकं मेल्यानंतर सुविधा देणार का असा संतप्त सवालही सदस्यांनी केला. कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र सभा घेण्याची मागणी राहुल दिवे यांनी केली.

सुधाकर बडगुजर

खासगी रुग्णालयांचे लेखापरीक्षण करण्याची मागणी सुधाकर बडगुजर यांनी केली. मार्च महिन्यात योग्य पद्धतीने नियोजन केले असते तर इतकी मोठी रुग्णसंख्या वाढली नसती असे सांगत बडगुजर म्हणाले की, सुमारे २० लाख लोकसंख्या असलेल्या नाशिकमध्ये केवळ २० व्हेंटिलेटर्स आहेत. पंतप्रधानांच्या निधीतून मिळालेले व्हेंटिलेटर धूळखात पडलेले आहेत. हे ढिसाळ काम महापालिकेचे असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. ऑक्सिजनची उपलब्धता, ऑक्सिजन पाईप्स नसणे, बेड उपलब्ध न होणे आदींबाबतीत रुग्णांना असंख्य अडचणी येत आहेत. खरे तर, महापालिकेने एजन्सी दराने तसेच वाढीव दराने ऑक्सिजन घेण्याची तयार हवी होती. मात्र यावर प्रशासनाने कोणतेही नियोजन केलेले नाही की त्यांचे नियंत्रणही नाही. त्याचाच फायदा घेत खासगी हॉस्पिटल्स रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा दराने बिले आकारत आहेत. ३९ दिवसात एका खासगी रुग्णालयाने तब्बल ४६ कोटी रुपयांचा टर्नओव्हर केला अशी धक्कादायक माहिती त्यांनी सभागृहात दिली. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे यावर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे रुग्णांना अक्षरश: लुटले जात आहे. या हॉस्पिटलमध्ये ऑडिटरची नेमणूक करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. खासगी रुग्णालयांचे ऑडिट होणे गरजेचे आहे. सर्व रुग्णालयांची माहिती घ्यावी, किती रुग्ण दाखल होते. त्या रुग्णांचा मोबाइल क्रमांक, पत्ता आणि बिल याची माहिती घ्यावी, रुग्णाची आर्थिक परिस्थिती बघूनच त्याला दाखल करण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. रुग्णालयात काम करणारे अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा आरोग्य विमा काढण्यात यावा अशी मागणी सत्यभामा गाडेकर यांनी केली. भाजपाचे प्रा. शरद मोरे यांनीही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अनागोंदी सुरु असल्याचा आरोप केला. सर्व सुविधा असतानाही रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट दाखवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षा भालेराव आणि समिना मेमन यांनीही आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर टीका केली. येत्या शुक्रवारी (दि. ११) कोरोनाच्या नियोजनासाठी विशेष सभा घेण्यात येणार असल्याचे यावेळी सभापती गिते यांनी जाहीर केले.

कल्पना पांडेंचा रौद्रावतार

स्थायी समितीच्या या सभेत शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचा रौद्रावतार बघायला मिळाला. नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमीत बांधकाम झाल्याने आपल्या प्रभागांतील घरांत पाणी शिरते असा दावा करीत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या ठिकाणी तातडीने संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करतानाच त्यांनी आयुक्तांच्या दालनाशेजारी सुरु असलेल्या ऑनलाईन सभास्थळी ठिय्या आंदोलन केले. संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करुन संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला जाईल असे यावेळी सभापतींनी स्पष्ट केले. मात्र तरीही पांडे यांचे समाधान झाले नाही. अखेर संबंधित अधिकार्‍यांना पाचारण करण्यात आले. संरक्षक भिंतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर पांडे यांनी आंदोलन मागे घेतले.