वॉईन शॉपमध्ये चोरी; चोरुन नेली आवडीची दारु, ९ हजारांची चिल्लरही लंपास

नाशिक शहरात घरफोडी, सोनसाखळी, दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आता चोरट्यांनी वॉईन शॉप लुटण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी ८१ हजार रुपयांची रोकड, ९ हजार रुपयांची चिल्लर लंपास करताना आवडीच्या ब्रँडची एक बॉटलची चोरी केली. ही घटना रविवारी (दि.११) रात्री विशाल वाईन्स, त्रिमुर्ती चौक येथे घडली. याप्रकरणी पुरुषोत्तम दत्तू चौधरी यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्त चौधरी यांचे त्रिमुर्ती चौकात दारुचे दुकान आहे. ते दुकानाला कुलूप लावून घरी आले होते. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्यांनी दारुच्या दुकानाचे शटर उडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानीताल ८१ हजार रुपये, ९ हजार रुपयांच्या चिल्लरचे नऊ प्लॅस्टिक गठ्ठे, डिव्हीआर, एक दारुची बाटली लंपास केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे करत आहेत.