Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शिर्डीला जाणार्‍या मुंबईच्या तीन साईभक्तांना ट्रकने चिरडले

शिर्डीला जाणार्‍या मुंबईच्या तीन साईभक्तांना ट्रकने चिरडले

Related Story

- Advertisement -

मुंबईहून शिर्डीकडे दूचाकीवरून जाताना शनिवारी (दि.२) मध्यरात्री एक वाजेदरम्यान नाशिक येथील लेखानगर परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत तीन साईभक्तांचा मृत्यू झाला असून, एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अंबड पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विलेपार्ले, मुंबई येथील सिद्धार्थ भगवान भालेराव (22), वैजनाथ जालिंदर चव्हाण (21), आशिष महादेव पाटोळे (19) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अनिश अरूण वाकळे (17) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून शिर्डी येथे दुचाकीवरून काही युवक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जात होते. शनिवारी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास युवक लेखानगर येथून उड्डाणपुलावरून जात होते. निलेश नंदकिशोर धावडे, सिद्धार्थ भगवान भालेराव, वैजनाथ जालिंदर चव्हाण, आशिष महादेव पाटोळे व अनिश अरूण वाकळे यांचेसह त्यांचे मित्र दूचाकीवरून शिर्डीकडे जात होते. निलेश आणि त्याचा मित्र सिद्धार्थ हे दुचाकी(एचएच 02- एफ एच-0610)वरून जात होते. तर आशिष, अनिश व वैजनाथ हे दुसर्‍या दुचाकी(एमएच-02-एफडी-4248)वरुन जात होते. वैजनाथ यांच्या जवळून एक गाडी गेल्याने त्यांच्या दुचाकीला धक्का लागल्याने दोन्ही दुचाकीवरील युवक धडकेने खाली पडले. त्याचवेळी मागून येणार्‍या भरधाव ट्रकवर चालकाला नियंत्रण मिळवता आले नाही. भरधाव ट्रकखाली आल्याने चौघे युवक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर या ठिकाणाहून जाणार्‍या नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेत जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत वैजनाथ चव्हाण, सिद्धार्थ भालेराव, आशिष पाटोळे यांना मृत घोषित केले. तर अनिश याच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात निलेश धावडे याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश शेवाळे करत आहेत.

- Advertisement -