घरमहाराष्ट्रनाशिकत्र्यंबक नगरी गुदमरली

त्र्यंबक नगरी गुदमरली

Subscribe

काँक्रिटीकरण, प्लास्टिक कचरा अन् अतिक्रमण कळीच्या समस्या; जिल्हाधिकार्‍यांच्या पाहणीतील निष्कर्ष

मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे त्र्यंबक मंदिरासह गावातही पाणी शिरल्याने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीसंर्दभात चिंता व्यक्त करत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी त्र्यंबकेश्वरला भेट देत पाहणी केली. यावेळी नाल्यांमध्ये वाढत चाललेला कचरा व त्याचा नदीमध्ये होणारा शिरकाव, गोदापात्रात झालेले काँक्रिटीकरण, अतिक्रण ही प्रमुख कारणे समोर आली. यावर मात करण्यासाठी दिर्घकालीन व लघुकालीन उपाययोजना आखण्यात येऊन यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले.

त्र्यंबक शहरात जाणार्‍या पाण्याच्या समस्येची कारणमिमांसा व त्यावर संभाव्य उपाययोजनांबाबत विचार विनिमय करण्याकरता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथे भेट देत पाहणी केली. या भेटीदरम्यान अहिल्या नदीचे उगमस्थान, निलगंगा नदीचा प्रवाह, गोदावरी नदीवर ठिकठिकाणी झालेले काम, विविध घाटांचे झालेले काम, त्याचप्रमाणे रस्त्यांचे कामांचीही त्यांनी पाहणी केली. त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्यावरील छोट्या पुलाच्या परिसरात पाणी साठून रस्ता बंद होत असल्याने त्या भागाचीदेखील पाहणी करण्यात आली. यानंतर तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत पाणी साठण्याची ठिकाणे व त्याचे कारण तसेच त्यावर संभाव्य उपाय याबद्दल विचार विनिमय करण्यात आला. या चर्चेदरम्यान उपस्थितांनी नाल्यांमध्ये वाढत चाललेला कचरा व त्याचा नदीमध्ये होणारा शिरकाव, गोदावरी नदीपात्रात झालेले अवाजवी काँक्रिटीकरण व त्यामुळे नदीचा आक्रसलेला प्रवाह, डोंगरामधील येणार्‍या प्रवाहांवर आखाड्याने घातलेल्या बंधार्‍यामुळे विस्कळीत झालेल्या पाण्याचा प्रवाह, डोंगरांमधून येणारे पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यासाठी व्यवस्थितपणे न ठेवलेली व्यवस्था कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले. त्यासंदर्भात काही लघुकालीन काही दीर्घकालीन उपायांवरदेखील चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

प्रामुख्याने मंदिरात घुसणारया पाण्याला तातडीने अटकाव करण्यात यावा त्याचप्रमाणे नदीचा प्रवाह सुरळीत राहण्याच्या दृष्टीने आतमध्ये केलेले अनावश्यक काँक्रिटीकरण दूर करण्यात यावे तसेच काही रस्त्यांची अवाजवी वाढलेली उंची कमी करण्यात यावी जेणेकरून पाणी थेट घरांमध्ये घूसणार नाही अथवा मंदिरातही बसणार नाही अशा प्रकारचे उपाय सुचवण्यात आले. दीर्घकालीन उपायांमध्ये डोंगरातून येणारे पाणी व्यवस्थित चैनल करून गावाच्या बाहेरून परस्पर नदीला बाहेर जोडता आले तर शहरात येणार्‍या पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल असा प्रस्ताव शासन विचारात असल्याचे सांगण्यात आले. एकूणच या चर्चेदरम्यान दीर्घकालीन वा लघुकालीन असे वर्गीकरण करून तातडीने काही उपाययोजना करता येईल याबाबत तज्ज्ञांशीदेखील विचारविनिमय करून योग्य आराखडा बनवण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी दिले. यावेळी संबंधित अधिकारी नगरपालिकेतील नगरसेवक शहरातील नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  • या उपाययोजनांवर चर्चा
  • अनावश्यक काँक्रिटीकरण दूर करणे
  • रस्त्यांची अवाजवी वाढलेली उंची कमी करणे.
  • डोंगरातून येणारे पाणी व्यवस्थित चॅनल करून नदीप्रवाहात सोडणे.
  • मंदिरातील अनावश्यक काँक्रिटीकरण काढणे.
  • नदीपात्रातील अतिक्रमण काढणे.
  • नालेसफाई करणे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -