नाशिकमध्ये उड्डाणपूलावरुन ट्रक कोसळला

मुंबई येथून नाशिककडे येणारा मालवाहू ट्रक इंदिरानगर बोगद्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून खाली कोसळला.

Nashik
Truck
पुलावरुन खाली कोसळल्यानंतर ट्रकमधील ऑईलचे ड्रम रस्त्यावर पडलेले होते.

मुंबई येथून नाशिककडे येणारा मालवाहू ट्रक इंदिरानगर बोगद्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून खाली कोसळला. या अपघातात ट्रकसह ट्रकमधील ऑईलच्या ड्रमचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे येणारा मालवाहतूक करणाऱ्या ट्रकवरील (एम.पी-०७, एच.बी.-८१४२) चालकाचे नियंत्रण सुटल्याने इंदिरानगर बोगद्याजवळ उड्डाण पुलावरून हा ट्रक खाली कोसळला. या अपघातात ट्रकचालक कुमार श्रीवास्तव (४०), दीपेन शर्मा (३९) शमशाद खान (४३. सर्व रा. मध्यप्रदेश) हे किरकोळ जखमी झाले. ट्रकमध्ये ऑईलचे मोठे ड्रम असल्याने ट्रक कोसळताच हजारो लिटर ऑईल रस्त्यावर सांडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी वाहतूक पोलीस व अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी तत्काळ उपाययोजना करत वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवले.