गावठाणात तब्बल २२ टक्के पाणी कपात

नगरसेवक गुरुमित बग्गा यांचा आरोप; ५ टक्केच पाण्याची बचत झाल्याचा दावा

Nashik
Water supply cut

दररोज एक वेळ पाणीकपात करुन महापालिकेने आजवर केवळ ५ टक्केच पाण्याची बचत केली असून त्यासाठी संपूर्ण शहराला वेठीस धरण्यात आल्याचा आरोप नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी पत्रकार परिषदेत केला. गावठाण परिसरात आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना महापालिका प्रशासनाने या भागांत तब्बल २२ टक्के पाणी कपात केल्याचा दावाही बग्गा यांनी केला.

शहरात गेल्या ३० जूनपासून सर्व विभागात एकवेळ पाणी पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेच्या सहा पैकी चार विभागात दोन वेळा पाणी पुरवठा होतो तो एकवेळ करण्यात आला. त्याच प्रमाणे पावसाने ओढ दिल्यानंतर दर गुरूवारी ड्राय डे म्हणजे कोरडा दिवस पाळुन पाणी पुरवठाच न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, जुलै महिन्याच्या प्रारंभी पासून इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या वर गेला. त्यामुळे पाणी कपात अंशत: रद्द करण्यात आली आहे. प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार ३० जूनपासून शहरात दररोज एकच वेळ पाणीपुरवठा होत आहे. तसेच दोन गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद करण्यात आला. या कपातीमुळे ७५ दशलक्ष घनफूट म्हणजेच सात दिवस पुरेल इतकी पाण्याची बचत झाली. प्रत्यक्षात दररोज एक वेळ पाणी बंद केल्याने आजवर केवळ ५ टक्केच पाण्याची बचत झाल्याचे बग्गा यांनी स्पष्ट केले.

दिवस- केलेला पाणीपुरवठा (दलघफू)

 • २९ जून- ४६१.४७
 • ३० जून- ४१५.३५
 • १ जुलै- ४२३.६२
 • २ जुलै-४३०.९
 • ३ जुलै- ४०१.७२
 • ५ जुलै- ४४९.८०
 • ६ जुलै- ४२७.९९
 • ७ जुलै- ४१९.९४
 • ८ जुलै- ४४३.७१
 • ९ जुलै- ४३९.४७
 • १० जुलै- ४०८.५५
 • १२ जुलै- ४४२.३१
 • १३ जुलै- ४३३.२८