दोन लाख बालकांना मिळाली थेट मदत

बालकांमध्ये झपाट्याने होत असलेल्या बाल हक्कांप्रतीच्या जागृतीमुळे वर्षभरात ’चाईल्डलाईन’वर सव्वा कोटी कॉल्स

Nashik
child abuse
पिडीत आणि अडचणीत सापडलेल्या मुलांना चाइल्ड लाइन देवदूतासारखी ठरते.

बालकांमध्ये झपाट्याने होत असलेल्या बाल हक्कांप्रतीच्या जागृतीमुळे २०१७-१८ या वर्षात ’चाईल्डलाईन’ (१०९८) या हेल्पलाईनवर तब्बल १ कोटी १५ लाख ५९ हजार ७५० कॉल्स केले गेले. या कॉल्स पैकी सरळ हस्तक्षेप करून २ लाख १८ हजार २६६ बालकांना मदत केली गेली. कॉल्सची वाढती संख्या या अभिनव योजनेची फल निष्पती मानली जात आहे.

अडचणीत सापडलेल्या बालकांना तत्काळ मदत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखाली ’चाईल्डलाईन’ ही आपत्तीग्रस्त बालकांना थेट सेवा देणारी महत्वाकांक्षी योजना देशभरात सुरू आहे. ’१०९८’ या टोल फ्री क्रमांकावरून संकटात सापडलेल्या बालकाने कॉल केल्यास संबंधित कार्यक्षेत्रातील ’चाईल्डलाईन’चे कर्मचारी विनाविलंब त्याच्या जवळ पोहचून त्याची अडचण समजून घेतात. किरकोळ स्वरुपाच्या अडचणी हे कर्मचारी जागेवर सोडवून बालकास त्याच्या पालकांचा पत्ता विचारून किंवा शोधून घरी पोहोचते करतात. बालकाच्या अडचणीचे प्रकरण गंभीर स्वरुपाचे असल्यास ’चाईल्डलाईन’चे कर्मचारी नजिकच्या पोलीस ठाण्याशी आणि बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समितीशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाने समस्याग्रस्त बालकाचे ’रेस्क्यु ऑप्रेशन’ सुरू करतात.

२०१७-१८ च्या तुलनेत २०१३-१४ मध्ये बाल हक्कांप्रती सर्व स्तरावर उदासीनता असल्याने संकटात सापडूनही माहितीचा अभाव असल्याने बालकांकडून चाईल्डलाईनच्या हेल्पलाईनला प्रतिसाद कमी होता. २०१३-१४ मध्ये ही कॉल्सची संख्या ३८ लाख २२ हजार ८१ होती. गेल्या चार वर्षात ही संख्या तिपटीने वाढली, चाईल्ड हेल्पलाईन, मदतीसाठी दूरध्वनी आल्यानंतर बाल हक्क कायद्यानुसार मदतीची पावले उचलली जातात,याचा प्रचार प्रसार महिला व बालविकास विभागाकडून प्रभावीपणे वृत्तपत्र, दूरचित्रवाणी, आकाशवाणी आणि गावागावात पोस्टर फ्लेक्सच्या माध्यमातून केल्याने २०१८ अखेर बालकांचा प्रतिसाद कोटीचा आकडा पार करून गेला.

ravindrakumar jadhav
रवींद्रकुमार जाधव

व्याप्ती ग्रामीण भागापर्यंत वाढवणे गरजेचे

बाल हक्कांप्रती खुद्द बालकांमध्ये होणारी जागृती स्वागतार्ह आहे. त्यांच्या मदतीसाठी ‘चाइल्ड लाइन’ची ’हेल्पलाइन’ खर्‍या अर्थाने दीर्घकालीन ’लाइफ लाइन’ ठरावी, या दृष्टीने महिला व बालविकास विभागाने या योजनेची व्याप्ती शहरी भागापुरती मर्यादीत न ठेवता ग्रामीण भागापर्यंत वाढवणे गरजेचे आहे. – रवींद्रकुमार जाधव, बालमानस व सामाजिक समस्या विश्लेषक

 

प्रणिता तपकीरे

पोलिसांच्या मदतीने सोडविण्याचा प्रयत्न

बालविवाह आणि बाल लैगिंक शोषण यांसाठी सर्वाधिक कॉल चाइल्ड लाइनला येतात. त्याचप्रमाणे बालकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यासही कॉल येतात. कॉल करणार्‍यांमध्ये बालकांचा समावेश असतो. परंतु पालक किंवा ज्याचे शोषण होत आहे, त्या बालकाच्या आजूबाजूची मंडळी कॉल करुन चाइल्ड लाइनला माहिती अवगत करुन देतात. त्यानुसार आम्ही पोलिसांच्या मदतीने बालकांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो. – प्रणीता तपकीरे, शहर समन्वयक, चाइल्ड लाइन, समाजकार्य महाविद्यालय

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here