सीता सरोवरात दोन तरुण बुडाले

Nashik

म्हसरूळ येथील प्राचीन सीता सरोवरात हात-पाय धुण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २०) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. हर्षल उर्फ विकी राजेंद्र साळुंखे (३४, रा. ओमकारनगर, म्हसरूळ) व हेमंत श्रीधर गांगुर्डे (३२, रा. राजू नगर, म्हसरूळ) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेमंत गांगुर्डे व हर्षल साळुंखे हे तीन मित्रांसोबत गुरुवारी रात्री सीता सरोवरात गेले होते. त्यातील चौघेजण हात-पाय धुण्यासाठी पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले. हर्षल साळुंखेने दिंडोरी रोडवरील एक हॉटेल काही महिन्यांपूर्वी चालवायला घेतले होते. तसेच तो खासगी कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई-वडील व बहीण असा परिवार आहे. तर हेमंत गांगुर्डे याचा इलेक्ट्रीक कामाचा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी, आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे.

पाच तरुण सीता सरोवरात रात्री कशासाठी गेले होते?, याबबत कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. अनेक दिवसांपासून म्हसरूळ गावाच्या नजीक असलेल्या सीता सरोवर परिसरात अनेकजण मद्यप्राशन करण्यासाठी येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. याप्रकरणी नागरिकांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत.