घरमहाराष्ट्रनाशिकबॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा

बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे भाजपला आव्हान

विधानसभेत काँग्रेसच्या पन्नास जागाही निवडून येणार नाहीत, असे भाकित भाजपकडून वर्तवण्यात आले आहे. याचाच अर्थ लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अगोदरच ईव्हीएम सेटींग करण्यात आले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. भाजपला इतकाच आत्मविश्वास असेल तर त्यांनी विरोधकांची मागणी मान्य करत ईव्हीएम ऐवजी बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हान चव्हाण यांनी दिले.

काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याअनुषंगाने जिल्हावार बैठका घेऊन पक्षाने कोणत्या जागा लढवाव्यात याची चाचपणी करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी (दि.३०) नाशिक येथे पदाधिकार्‍यांशी चर्चा करत आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ३०० जागांचा अंदाज वर्तवला होता. त्याचप्रमाणे भाजप नेत्यांकडून राज्यात २२० जागांचा अंदाज वर्तवला जात आहे. याचाच अर्थ ईव्हीएम सेटींग झाले आहे. लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात उमेदवाराला पडलेली मते आणि ईव्हीएममधील मते यात मोठया प्रमाणात तफावत आढळून आली. यानंतर देशातील सर्व विरोधीपक्ष एकत्रितपणे ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करत असताना भाजप ईव्हीएमवर ठाम असल्याने त्यांच्या भूमिकेवर चव्हाणांनी प्रश्न उपस्थित केला.

- Advertisement -

पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांशी चर्चा करून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पक्षाने समविचारी पक्षांशी चर्चा करण्यापूर्वी सर्वेक्षण सुरू केले आहे. ६ जुलैपर्यंत पक्षाकडून इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. यात नवीन चेहर्‍यांना संधी देण्याची मागणी पुढे आली आहे. मात्र, नवीन चेहर्‍याला संधी देताना निवडून येण्याची क्षमता विचारात घेऊन पक्ष निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. पक्षाचे मेळावे, सभा घेण्याबरोबरच सरकारविरोधात आंदोलन केले जाणार आहेत. पाच वर्षांत सरकारने दिलेली आश्वासने आणि त्या आश्वासनांची अंमलबजावणी, पाऊस लांबल्याने निर्माण झालेली दुष्काळी स्थिती, बँकांकडून शेतकर्‍यांना अर्थसहाय्य मिळत नसल्याने सर्वच पातळीवर सरकार अपयशी ठरले आहे. सरकारचे अपयश जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस अध्यक्षांबाबत केलेल्या वकतव्याचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, दानवेंनी आपल्या पक्षापुरते बोलावे. उगाच इतर पक्षात अध्यक्षपदाबाबत कोण इच्छुक आहेत, याची चाचपणी करत बसू नये. त्यांनी अगोदर आपला उत्तराधिकारी नेमावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

वंचित आघाडीशी चर्चा सुरू

वंचित आघाडीला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ११ जागांवर फटका बसला. अर्थात त्यावेळीही वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न लोकसभेलाही झाला होता. विधानसभेसाठी वंचितशी चर्चा करण्यासाठी माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी त्यांचा प्रतिसाद काय येतो हे पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisement -

पुढील आठवडयात बैठक

राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास पक्षाने तत्वतः मान्यता दिली आहे. त्यानुसार जागावाटपाचा निर्णय राज्यातील नेत्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यानुसार पुढील आठवडयात राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन जागा वाटपाबाबत चर्चा केली जाईल. जुलैअखेर जागा वाटप अंतिम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

मनसेबाबत मतभिन्नता

मनसेची भूमिका भाजपविरोधी आहे. त्यामुळे विधानसभेत मनसेला सोबत घेण्याबाबत पक्षापुढे प्रस्ताव आहे; परंतु याबाबत पक्षात मतभिन्नता आहे. याबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -