Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक वडापाव महागला; १२ ते १५ रुपये मोजावे लागणार

वडापाव महागला; १२ ते १५ रुपये मोजावे लागणार

किंमतीत ३ रुपयांनी वाढ; तेल, बेसन पीठ, बटाट्याच्या भाववाढीचा फटका

Related Story

- Advertisement -

मिसळपाठोपाठ नाशिकच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेल्या वडापावाचा भाव वाढला आहे. बेसन पीठ, खाद्य तेल, बटाटे, इंधन आदींचे दर वाढल्याने संबंधित विक्रेत्यांनी एकमेकांशी चर्चा करुन भाववाढ करण्याचा निर्णय घेतला. साधारणत: एका वडापावमागे आता तीन रुपये भाववाढ होणार असून यापुढे १२ रुपयांचा वडापाव १५ रुपयांना मिळेल.

गरिबांची पोटपूजा, मध्यमवर्गीयांचे फावल्या वेळेतील उदरभरण आणि श्रीमंतांसाठी चवीचे खाणे असलेला पदार्थ म्हणजे वडापाव . सर्वात लोकप्रिय ठरलेले हे अस्सल मराठमोळे ‘फास्ट फूड’ लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वानाच जवळचे वाटते. खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळालेला वडापाव हातगाडीपासून थेट पंचतारांकित हॉटेलांच्या चकचकीत टेबलांवर पोहोचला आहे. अतिसामान्यांपासून उच्चभ्रूंच्या जिभेवर त्याची चव रेंगाळली आहे. केवळ वडापावच्या विक्रीसाठी साखळी पद्धतीची दुकाने सुरू झाली आहे. दोन-तीन रुपये दरापासून सुरू झालेला वडापावचा प्रवास पंधरा रुपयांपर्यंत पोहोचला. महागाईबरोबर त्याचे दरही वाढले. वडापाव मिळत नाही, असा एकही भाग शहरात सापडणार नाही. काही जण सांगतात की, आमच्यावेळी दीड ते दोन रुपयांना वडापाव मिळत होता. पण, पुढे हा वडापाव अनेक दिवस चार ते पाच रुपयांपर्यंत स्थिरावला. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत वडापाव पाच रुपयांनाच होता. चणाडाळीच्या दरांत झालेल्या वाढीमुळे डाळीचे पीठ महागले आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे भुईमुग, सोयाबीनसह तेलबिया पिकांचे नुकसान झाल्याने त्याचे बाजारात परिणाम दिसू लागले आहेत. त्याचा दणका तेलांच्या दराला बसला आहे. विविध प्रकारच्या खाद्य तेलांच्या दरात दिवाळीनंतर वाढ झाली आहे. बटाट्याचाही भाव अलिकडे वाढला आहे. त्यातच इंधनाचे दरही प्रत्येक आठवड्यात वाढत आहेत. ज्यांचे भाडेतत्वावर हॉटेल्स आहेत, त्यांचे लॉकडाऊनमध्ये प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व बाबींचा परिणाम वडापावच्या किंमत वाढीवर झाला आहे.

वडापाव तयार करण्यासाठी लागणार्‍या पदार्थाची किंमत लक्षात घेता, वडापाव १०-१२ रुपयांत आत विकणे शक्य नाही. सध्या तेल १०० ते १३० रुपये लिटर, बेसन १०० रुपये किलो, तर बटाटा ४० ते ५० रुपये किलो या दराने मिळतो. इंधनाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे किंमत वाढवण्याशिवाय सध्या पर्याय उरलेला नाही. – निवास मोरे, संचालक, नाशिक वडा

- Advertisement -