घरमहाराष्ट्रनाशिकथोरातांना नामोहरण करण्यासाठी विखेंची फिल्डिंग

थोरातांना नामोहरण करण्यासाठी विखेंची फिल्डिंग

Subscribe

संगमनेरात विखे परिवारातून एकाची उमेदवारीची शक्यता; घराचाही शोध सुरू

अंकुश बूब, संगमनेर

लोकसभा निवडणुकीत विंखेंविरोधात केलेला प्रचार आमदार बाळासाहेब थोरात यांना चांगलाच जड जाण्याची चिन्हे आहे. अवघ्या ५ महिन्यांवर येवून ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी थोरात यांना थेट विखे यांच्या घरातीलच उमेदवारांच्या सामना करावा लागेल, असे दिसत आहे. तशी तयारी विखे परिवाराकडून सुरू झाल्याची चर्चा आहे. विखेंची यंत्रण कामाला लागली असून संगमनेरात घर पाहण्यापासून कार्यकर्त्यांची जुळवाजुळवही सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

माजी महसूल मंत्री थोरात यांचे कोणतेही नुकसान केलेले नसताना त्यांनी नगर मतदारसंघात उमेदवारीसाठी विरोध केला होता. थोरातांनी चुकीच्या माणसाला बोट लावले, आपण राधाकृष्ण विखे नाही. परतफेड निश्चितपणे केली जाईल, असा इशारा खासदार सुजय विखे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मालदाडरोड येथे झालेल्या सभेत दिला होता. तेव्हापासूनच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. थोरात यांनी विखेंच्या विरोधात नगर मतदारसंघात सभा घेवून टीकाही केली होती. ही टीका विखे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. ते संगमनेर विधानसभा मतदारसंघात लक्ष घालणार हे तेव्हाच निश्चित झाले होते. सुजय विखे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. या विजयानंतर संगमनेर विधानसभा निवडणुकीत विखे कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. थोरात यांचे संगमनेरात अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. सहकारी संस्था, नगरपालिका, पंचायत समिती अशा सर्वच संस्था त्यांच्या ताब्यात असून कार्यकर्त्यांचे जाळे ही मोठे आहे. संगमनेरातील विरोधकांना थोरातांना चुरशीची लढत यामुळे देता आली नाही. विरोधकातील असंघटीतपणाही थोरातांच्या पथ्यावर पडला आहे. विरोधी उमेदवारांना भरपूर मतदान होत असतानाही असंघटीत विरोधकांमुळे थोरातांना आजपर्यंत यश आले आहे. विखे यांना याची जाणीव आहे. विखे यांना मानणारा मोठा वर्ग संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आहे. विखेंच्या विजयाने संगमनेरातील त्यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शालिनीताई, धनश्री विखे यांची चर्चा

विखे यंत्रणेने संगमनेरात चाचपणीही सुरु केल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या पत्नी व जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे किंवा खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे या दोघींच्या नावाची चर्चा संगमनेरात सुरू झाली आहे. विखे परिवाराने संगमनेर विधानसभेची निवडणुक लढविल्यास थोरातांपुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे. विखेंची यंत्रणा विधानसभेसाठी कामालाही लागली आहे. निवडणूक लढवायची असल्यास संगमनेरात घर असावे, यासाठी घराची पाहणीही सुरू झाल्याची चर्चा होत आहे.

- Advertisement -

…तर आम्हीही शिर्डी लढवू

विखे कुटुंबातील सदस्यांने संगमनेर विधानसभा मतदारसंघात हस्तक्षेप केला तर आम्हीही शिर्डी विधानसभा निवडणूक लढवू शकतो, अशी प्रतिक्रीया काँग्रेसचे कार्यकर्ते खासगीत बोलताना व्यक्त करतात. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अहमदनगर विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांना मतदारासंघ नसल्याने शिर्डी विधानसभा मतदारसंघात ते आपले नशिब अजमावू शकतात. तांबे यांची उमेदवारी गृहित धरून विखे यांनी दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली असल्याचेही जाणकार मंडळी बोलताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -