घरमहाराष्ट्रनाशिकनवीन पूल बांधून आम्हाला बुडवू नका, जुन्यांचीच उंची वाढवा

नवीन पूल बांधून आम्हाला बुडवू नका, जुन्यांचीच उंची वाढवा

Subscribe

सुयोजीत गार्डन परिसरातील रहिवाशांची मागणी; आ. फरांदे यांनी घेतली संवादात्मक बैठक

सन १९८१ ला आलेला पूर आणि काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरातील पाण्याच्या पातळीत फारसा फरक नव्हता. १९८१ ला आलेल्या पूरात कन्नमवार पुलाखालील पाण्याची पातळी ५६५ मीटर इतकी होती. यंदा या पातळीत पाच मीटरने वाढ झाली आहे. पावसाचे प्रमाण आणि नदीपात्रातील पाण्याचे प्रमाणही जवळपास सारखेच असताना केवळ नदीपात्रातील बांधकामांमुळे विशेषत: पुलांमुळे पूराचा प्रभाव वाढला. त्यात अजून दोन पुलांची भर पडल्यास पहिल्या मजल्यापर्यंत पाणी जाईल, अशी भीती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली. यावेळी सुयोजित गार्डन, आयचीत नगर, चैतन्य नगर, मधूकमल नगर येथील नागरिकांनी नवीन दोन पूल बांधण्यापेक्षा जुन्या पुलांच्या जागेवर अधिक उंचीच पूल बांधण्याची एकमुखी मागणी केली. यासंदर्भात सोमवारी (दि. २६) आयुक्तांची भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले.

गोदावरीला आलेल्या पूरामुळे गंगापूर रोडवरील पात्राजवळील नागरी वसाहतीत पाणी शिरले होते. त्यात मोठी वित्तहानी झाली. पूराचा प्रभाव कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल याविषयी चर्चा करण्यासाठी आ. फरांदे यांनी सुयोजित गार्डन येथे नागरिकांशी संवाद बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी प्रा. फरांदे म्हणाल्या की, सन २००८,२०१६ आणि २०१९ मध्ये आलेल्या पुरामुळे नाशिक शहरातील अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले. या पाण्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे. नाशिक महापालिकेने बांधलेले पूल गोदावरी आणि नंदिनी नदीला आलेल्या पुरात पाण्याखाली जात असल्याने या पुलांना पाडून त्याजागी महत्तम पूर रेषेच्या वर नवीन पूल बांधण्याची नितांत आवश्यकता आहे. नदीपात्रात अडथळा ठरणारी बांधकामे आणि बंधारे हटविण्याचा अहवालही केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्था यांनी नाशिक पालिकेला दिलेला असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी पावर पाँइंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून सर्व नागरिकांना नदीच्या प्रवाहाला अडथळे निर्माण करणार्‍या बांधकामात या दोन नवीन पुलांमुळे भर पडून पुराचा प्रभाव कसा वाढेल आणि कोणकोणत्या भागात पुराचे संकट कोसळेल हे समजावून सांगितले.

- Advertisement -

या संवादात्मक चर्चेत सुयोजित नगर, आयाजित नगर, साई सोसायटी, कमलकुंज सोसायटी, मधुकमल सोसायटी,चैतन्य नगर या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांनी पुरासंदर्भात आपली मते व्यक्त केली. या संवादात्मक चर्चेत सुयोजित नगरचे चेअरमन प्रवीण मराठे, निखील पवार, भरत जाधव, आशिष पाटील, राजेंद्र छाजेड, दर्शन बाम, सोनल दगडे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

काय म्हणाले रहिवाशी?

परिसरातील रहिवाशी स्वानंद नवसारीकर यांनी यंदाच्या पुरामुळे सुयोजित गार्डनची संरक्षक भिंत डॅमेज झाल्याचे सांगत लवकरात लवकर महत्तम पूर रेषेच्या वर पूल बांधणे आवश्यक असल्याची मागणी केली. या परिसरात १६२ कुटुंब वास्तव्यास आहेत ही संरक्षक भिंत खचली तर खूप मोठी जीवित आणि वित्तहानी होईल अशी भीतीही त्यांनी वर्तविली. इतर सर्व नागरिकांनीही नवीन पुलांची आवश्यकता नसल्याचे मत व्यक्त करत नवीन पुलांच्या बांधणीस विरोध दर्शवला. जुन्या पुलांचे स्ट्रकरल ऑडिट करुन ते पूर्ण न पाडता केवळ वरचा भाग पाडून ते उंच करावेत, अशी मागणी सुनील चोपडा यांनी केली. जलसंपदा विभागाची परवानगी न घेता अशा प्रकारे नवीन पूल बांधताच येत नसल्याचे मोतीलाल पाटील यांनी सांगितले. पूरात अनेकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी हेतल पटेल यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -