घरमहाराष्ट्रनाशिकआम्ही पाणी देतो; तुम्ही अन्न द्या!

आम्ही पाणी देतो; तुम्ही अन्न द्या!

Subscribe

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेला जोडणार्‍या दमणगंगा नदीकाठी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चार गावांना पाणी पुरवणार्‍या टँकर चालकाला जेवणासाठी गावकर्‍यांच्या भरवशावर रहावे लागते, ही शोकांतिकाच म्हणावी.

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेला जोडणार्‍या दमणगंगा नदीकाठी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चार गावांना पाणी पुरवणार्‍या टँकर चालकाला जेवणासाठी गावकर्‍यांच्या भरवशावर रहावे लागते, ही शोकांतिकाच म्हणावी. घाटमाथ्यावरील अरुंद रस्त्यांवरून धोकादायक वळणांचा जीवघेणा प्रवास करत टँकरचालक गावात पाणी घेऊन पोहोचतो. तोच पुरुष, महिला अन् बच्चेकंपनी हंडे, ड्रम आणि मिळेल ते भांडे घेऊन धावत सुटतात. यावेळी विहिरीजवळ टँकर उभा करून टँकरचालक विसाव्याला सावली तर शोधतोच पण त्याहून जास्त विचार तो करतो पोटासाठी अन्नाचा. कारण गावापर्यंत पाणी तर तो पोहोचवतो, पण त्याला जेवायला कोण देणार हा प्रश्न असतो. याची कुठलीच तजवीज ठेकेदार वा प्रशासनाकडून केली गेलेली नसल्याने जीव धोक्यात घालून दुसर्‍यांचा जीव वाचविण्यासाठी आलेल्या या चालकाला आपल्याला आज जेवण कोण देणार? याची चिंता रोजच सतावते.

जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद होणार्‍या तालुक्यांमध्ये त्र्यंबकचा समावेश होतो. या तालुक्यातील बहुतेक गावे डोंगरमाथ्यावर असल्यामुळे येथे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासते. त्यापैकी हरसूलपासून १२ कि. मी. अंतरावरील गुजरात सिमेलगत असलेले काकडपाना हे गाव. येथील सर्व घरे कौलारू. गावापासून अर्ध्या किलोमीटरवर सार्वजनिक विहीर आहे. सद्यस्थितीत ती कोरडीठाक असून, गावात येणार्‍या टँकरचे पाणी त्यात टाकले जाते, मग सुरू होतो काकडपानाच्या रहिवाशांचा पाणी मिळवण्याचा जीवघेणा प्रवास. १५ किलोमीटरवरील हातलोंढी या गावातून १२ हजार लिटर क्षमतेचा टँकर डोंगर, दर्‍या, झाडांमधून मार्ग काढत धोकादायक प्रवास करत चालतो. चालकाकडून एक चूक झाली तरी जीवाशी खेळ, त्यामुळे डोळ्यात तेल घालून टँकर चालवण्याची कसरत. उभ्या चढावर तर सोबतीला असलेल्या ग्रामपंचायत शिपायाला वारंवार उतरून पळत-पळत मोठ-मोठ्या दगडांची उटी लावत या गाडीला घाट पार करून देण्याची किमया पार पाडावी लागते. १५ किलोमीटरसाठी किमान २ तास लागतात.

- Advertisement -

अशा पद्धतीने घाम गाळत टँकरचालक कसाबसा गावात पोहोचतो. पण येथे आल्यावर त्याला चिंता पडते ती पोटाची भूक भागवण्याची. कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव टाकळी येथील सुनील जीटे असे या चालकाचे नाव असून कंत्राटदाराने त्याची नियुक्ती त्र्यंबकला केली. येथून दररोज घरी जाणे शक्य नसल्यामुळे जेवण व राहण्याची व्यवस्था नाही. टँकरमध्येच झोपायचे आणि मिळेल त्या घरी खायचे? हा त्याचा नित्यक्रम. काकडपाना, बेेहेडमाळ, शेवगापाडा व बाभळीमाळ या चार गावांची नियमित तहान भागविणारा सुनील दररोज कोणाच्या तरी घरी जेवण करतो. कधी सोय झाली नाही, तर ग्रामपंचायतीचे शिपाई कृष्णा खंडू वड यांच्या घरी तो जेवतो. टँकरचालकाची ही परवड म्हणजे सरकारी मानसिकतेचे एक विदारक चित्रच.

शिपायास तीन वर्षापासून वेतन नाही

ग्रामपंचायतीचे शिपाई कृष्णा वड हे १९८८ पासून चिंचओहळ ग्रामपंचायतीचे शिपाई म्हणून काम करतात. तीन वर्षांपासून त्यांना मानधन मिळालेले नाही. ग्रामसेवकांकडे वारंवार मागणी केली तर ‘आज देतो’, ‘उद्या देतो’ म्हणून टाळाटाळ करतात. वेतन नाही मग काम कसे करणार? पण टँकरसोबत नाही गेले तर टँकरचालक हा जीवघेणा प्रवास कसा करणार? गावकर्‍यांना पाणी कसे मिळणार, याची काळजी म्हणून टँकरसोबत जावेच लागत असल्याची व्यथा त्यांनी व्यक्त मांडली.

- Advertisement -

जेवणाचीही व्यवस्था नाही

चार गावांना नियमित पाणीपुरवठा करतो. माझे गाव कोपरगाव तालुक्यात असल्यामुळे येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था नाही. या परिसरात दुष्काळामुळे हॉटेल्स वैगेरे सुविधाही नाहीत, त्यामुळे मिळेल त्या गावकर्‍यांच्या घरी जेवण करावे लागते. – सुनील जीटे, टँकरचालक

काम करणे अवघड

ग्रामसेवकाने तीन वर्षांपासून आमचे मानधन थकवले आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे काम म्हणून टँकरसोबत राहतो. ग्रामसेवकाकडे मागणी केल्यास ते ‘आज देतो’, ‘उद्या देतो’ म्हणून वेळ मारून नेतात. पण आता काम करणे अवघड झाले आहे. घरखर्च भागवणे खूपच अवघड झाले आहे. – कृष्णा वड, शिपाई (चिंचओहळ)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -