घरमहाराष्ट्रनाशिकमतदान तुम्हालाच, पण डिस्टर्ब करू नका!

मतदान तुम्हालाच, पण डिस्टर्ब करू नका!

Subscribe

असह्य उकाड्यात मतदारराजाचे प्रचारकांना आर्जव, शहरातील अनेक घरांवर अनोख्या पाट्या

वामकुक्षीची वेळ होते… डुलकी लागते न लागते तोच घराची बेल वाजते… समोर पाच-सात कार्यकर्ते प्रचारपत्र हातात टेकवतात आणि अमुक एका उमेदवारालाच मतदान करण्याचं आवाहन करतात. रोजच्या या ‘कटकटी’ला वैतागून नाशिक शहरातील अनेकांनी आता पुणेरी स्टाईलने दरवाज्याला पाट्या लावल्या आहेत. त्यात ‘आमचे मतदान तुम्हालाच आहे, पण कृपया डिस्टर्ब करून झोपमोड करू नका’ अशी विनंती करणार्‍या पाट्या लावलेल्या दिसून येत आहेत.

लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांच्या उमेदवारांसह कार्यकर्तेदेखील प्रचारासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता दारोदारी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. मात्र, दुसरीकडे मतदारराजाला या असह्य उकाड्यात वामकुक्षी अधिक गरजेची असल्याने त्यांच्यासाठी हे प्रचारक डोकेदुखी ठरत आहेत. सकाळपासूनच सुरू होणारी प्रचारकांची रिघ रात्रीपर्यंत संपेनाशी झाल्याने मतदारराजा त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. पंचवटीत काही उच्चभ्रू वसाहतींत तसेच सोसायट्या आणि बंगल्याच्या बाहेर पुण्याप्रमाणेच पाट्या झळकताना दिसून येत आहेत. ‘आमचे मतदान तुम्हालाच आहे, कृपया आमची झोपमोड करू नका’, ‘पुन्हा पुन्हा आम्हाला डिस्टर्ब करू नका’ असे ’टिपिकल’ आवाहन या लोकांनी केले असल्याने उमेदवार आणि प्रचारकांतही हा चर्चेचा विषय ठरत आहे.

- Advertisement -

प्रचारकांची गोची…!

मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या नाही तर मतदार आपल्याला मतदान करणार नाही आणि फलक लावलेला असतानाही आपण या घराचा दरवाजा ठोठावला तर नाराजीला सामोरे जावे लागेल, मग ते आपल्याला मतदान करतील का अशा द्विधा मनस्थितीत प्रचारक सापडले आहेत.

भावनाओं को समझो…

सतत कुठल्या ना कुठल्या निवडणुका येत असतात, त्यामुळे‘नेमेचि येतो उमेदवार’ याप्रमाणे विचार करून आता मतदारराजाने आपण मतदान करूच पण वारंवार त्रास देऊ नका असाच उपरेाधिक टोला या गळ्यात पडणार्‍या प्रचारकांना दिल्याचे दिसून येते. ‘भावनाआेंको समझो’ म्हणत निदान दुपारच्या प्रहरी तरी वामकुक्षी घेऊ द्या, काही वेळ उसंत घेऊ द्या असे म्हणत या नागरिकांनी आपल्या घरांवर पाट्या लावल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

प्रचंड मनस्ताप होतो

आमच्या घरातील बहुतांश सदस्य वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सातपूर औद्योगिक वसाहतीत कामाला जातात. त्यांना दुपारच्या वेळेस आराम करावासा वाटतो, मात्र वारंवार येणार्‍या प्रचारकांमुळे त्यांची झोपमोड होते. त्यामुळे प्रचंड मनस्ताप होतो. यासाठी आम्ही आता पाट्या लावून या प्रचारकांना आवाहन केले आहे. – आरती तांबे, गृहिणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -