घरमहाराष्ट्रनाशिकअवैध धंद्यांवर कारवाई पोलिसांनी नाही मग कुणी करावी?

अवैध धंद्यांवर कारवाई पोलिसांनी नाही मग कुणी करावी?

Subscribe

उपमुख्यमंत्री पवारांचा पोलीस आयुक्तांना खडा सवाल

अवैध धंद्यांवर जिल्हाधिकार्‍यांनी कारवाई करायची मग पोलीसांनी काय करायचं? ही कामाची कुठली पध्दत आहे? सरकार चारलवण्याचा आम्हाला अनुभव नाही का? प्रशासनाने काय करायचे हे आता तुम्ही आम्हाला शिकवणार काय असे खडे सवाल करत अवैधधंद्यांवर पोलीसांनाच कारवाई करावी लागेल. हे माझे आदेश आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची झाडाझडती घेतली.

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल वसुलीचे काम पोलिसांचे नसल्याचे सांगत केवळ कायदा व सुव्यवस्था राखणे आमचे काम असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले. अवैध मद्य विक्री, रोलेट, मटका, जुगार यांसह इतर अवैध धंद्यांविरोधात यापुढे महसूल विभाग तर वाहनांची तपासणी आर.टी.ओकडून केली जाईल असे सांगत अवैधधंदे मोडून काढण्यासाठी विविध यंत्रणांनी मॅकेनिझम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्षही उभारण्यात आला. मात्र लोकप्रतिनिधींनी यावर हरकत घेत थेट गृहमंत्र्याकडे धाव घेतली. रविवारी नाशिक दौर्‍यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही हा मुददा उपस्थित करण्यात आला. यावेळी नाशिकमधील ‘अजब पॅटर्न’ पाहून दादा चांगलेच भडकले. स्व.आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना मी अर्थमंत्री होतो. याकाळात महसूल वाढीसाठी अवैद्य दारुविक्रीवरील कारवाईचे अधिकार पोलिसांना दिले होते.

- Advertisement -

अवैधधंद्यांवर पोलीसांनी नाही तर मग कोणी कारवाई करायची असा सवाल त्यांनी पोलीस आयुक्तांना उद्देशून केला. यावर पोलीस आयुक्तांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना सुनावल्याचे समजते. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे कोणत्या विभागाचे काय काम आहे याची मला चांगली जाण आहे त्यामुळे मला शिकवू नका अवैधधंद्यांवर कारवाई असो किंवा कायदा सुव्यव्थेचा कोणताही विषय यावर कारवाई पोलीसांनाच करावी लागेल असे सांगत हा उपमुख्यमंत्र्यांचा आदेश असल्याची जाणीवही त्यांनी करून दिली. अवैध व्यवसाय मग तो एखाद्या राजकिय नेत्याचा का असेना तुम्ही कारवाई करा, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोणतेही अवैधधंदे हे परवानगी घेऊन सुरू केले जात नाहीत. त्यामुळे अवैध दारू, प्रवासी वाहतुकिचे गैरप्रकार, मटका, रोलेटपासून सर्व अवैध व्यवसायांवर पोलीसांनाच कारवाई करावी लागेल. त्यामुळे नाशिकमध्ये हे जे काही विविध विभाग एकमेकांवर बोट करून कारवाईस टाळाटाळ करतात, हे चालणार नाही.  – अजित पवार, उपमुख्यमंत्री

अवैध धंदे मग ते सर्वसामान्यांचे असो किंवा लोकप्रतिनिधींचे कारवाई ही व्हायलाच हवी. पण नाशिक पोलीस केवळ ज्यूस वाटपापुरते मर्यादित झाले आहे.याविषयी अजितदादांना कल्पना दिल्यावर ते पोलीस आयुक्तांवर चिडले. – सरोज अहिरे, आमदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -