आम्ही मेल्यावर पाणी पाजणार का?

मनमाडकरांचा उदिग्न सवाल; मंजुरी मिळूनही टँकरला वाट सापडेना

Nashik
manmad photo
रिकाम्या टाक्या घेवून पाण्याच्या टॅकरची प्रतिक्षा करताना तहानलेले नागरिक

मनमाड शहरातील तहानेल्या नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मंजूर केलेल्या ३० टँकरची संख्या दहाने कमी करून ती वीसवर आणण्यात आली. मात्र, हे २० टँकरदेखील शुक्रवारी (३१ मे) सायंकाळपर्यंत मनमाडल पोहोचले नाही. यामुळे हे २० टँकरही शासनाच्या लालफितीत अडकले तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. कदाचित २ जूनला पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. यामुळे तोपर्यंत टँकरचे गाजर दाखवून वेळकाढूपणा केला जात तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आम्ही मेल्यावर पाणी पाजणार का, असा उदिग्न सवाल मनमाडकरांनी केला आहे.

दरम्यान, पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना ट्रॅक्टरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासन व नगरसेवकांनी शहर परिसरातील अधिग्रहित केलेल्या विहिरींनी देखील तळ गाठला तर कूपननलिका बंद पडल्या आहेत. मुस्लीम बांधवांचा सण रमजान ईद तोंडावर आलेली आहे. यामुळे त्याच्यासह इतर नागरिकांना पाणी द्यायचे कुठून, असा प्रश्न त्यांना पडला आहे. मनमाडला पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण कोरडे पडल्यामुळे शहरात लातूरपेक्षा जास्त भयावह परिस्थिती निर्माण झाली. गेल्या एक महिन्यापासून शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा झालेला नाही. यामुळे नागरिकांची सहनशीलता संपली असून त्याचा उद्रेक कधीही होण्याची शक्यता असल्याचे पाहून पालिका प्रशासानसह सर्वपक्षीय नगरसेवकानी खासदार डॉ. भारती पवार, आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेवून त्यांना निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माहिती देवून पालखेड धरणातून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. पालखेड धरणातून लगेच पाणी सोडणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगून २ जूनला आवर्तन सोडू तोपर्यंत मनमाडला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देवून त्यासाठी तातडीने टँकर मंजूर केले होते. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, ३ दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही जिल्हाधिकार्‍याचे टँकर अद्यापही मनमाडला पोहोचले नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. तहानेल्या अवस्थेत आम्ही मेल्यानंतर पाणी मिळेल का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.