शेतीच्या वादातून लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

वासाळी येथील घटना; घोटी पोलिसांत खुनाचा गुन्हा

Crime-Murder

इगतपुरी : शेतात व बैलांमध्ये तुला वाटा देणार नाही, असे सांगितल्याचा राग आल्याने लहान भावाने रागाच्या भरात मोठ्या भावाच्या खून केल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे घडली. कोयत्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी लहान भावाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

वासाळी येथील हिरामण लक्ष्मण खादे व लालू लक्ष्मण खादे हे एकत्र राहत होते. गुरुवारी (दि. १०) हिरामण खादे हा मोठा भाऊ दारूच्या नशेत असताना लहान भाऊ लालू खादे व त्याच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. त्यात हिरामणने शेतीत व बैलात हिस्सा देणार नसल्याचे लालूला सांगितले. त्यामुळे संतापलेल्या लालूने तुला सोडणार नसल्याचे सांगितले. वाद वाढून लालूने हातातील कोयत्याने हिरामणच्या डोक्यात वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना हिरामणचा याचा मृत्यू झाला. मृत हिरामणची पत्नी लिलाबाई यांच्या तक्रारीवरून घोटी पोलिसांनी लालूविरुद्ध गुन्हा दाखल केला.