हाती झाडू घेत तरुणांनी केली ग्रामस्वच्छता

कोरोनाला रोखण्यासाठी आंबेवाडीतील बिरसा ब्रिगेड मित्रमंडळाचा पुढाकार; ग्रामस्थांना मार्गदर्शन

sWachhata abhiyan
कोरोनाला रोखण्यासाठी आंबेवाडीतील बिरसा ब्रिगेड मित्रमंडळाचा पुढाकार
विक्रम पासलकर : अस्वली स्टेशन
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनस्तरावरून वारंवार काळजी घेण्यासाठी तसेच परिसर स्वच्छ राखण्यासाठी सूचना करण्यात येत आहेत. मात्र, प्रत्यक्षात या सूचनांचे गांभीर्याने पालन करणे आणि त्यानुसार आचरण करणे याकडे अनेकांचे दुर्लक्षच होत आहे. जणू कोरोनाचे गांभीर्यचं हरपलं आहे. अशा स्थितीत इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील बिरसा ब्रिगेड मित्रमंडळाच्या वतीने संपूर्ण गावात हाती झाडू घेत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या जागरूक तरुणांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश देत कोरोना काळात खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात आले.
गाव स्वच्छ झाले, तर देश स्वच्छ होईल. देशाची तसेच गावाची स्वच्छता करण्यासाठी स्वतःपासून सुरूवात करावी. स्वच्छतेतून उज्ज्वलता मिळून एक आरोग्यदायी पिढी निर्माण होईल व गावात कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून संरक्षण मिळेल, या हेतूने संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे इगतपुरी तालुका उपाध्यक्ष विठ्ठल ठवळे यांनी सांगितले.
गावातील इतरांना स्वच्छतेचा संदेश देत या युवकांनी गावातील अंतर्गत रस्ते, अंगणवाडी, मुख्य मंदिरे, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय आदी ठिकाणी स्वच्छता करत परिसराचे रूपडे पालटण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वच ठिकाणी उपाययोजना करण्यात येत असून आपणदेखील राहत असलेला परिसर स्वच्छ राखण्यासाठी या गावातील तरुणांनी आदर्श घालून दिला. तसेच नागरिकांनादेखील प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शन केले. गावात कुठल्याही प्रकारचे आजार बळावणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे आवाहन उपाध्यक्ष ठवळे यांनी सांगितले.
या स्वच्छता अभियानात दत्ता जाधव, जनार्दन केकरे, देव जाधव, रोहित केकरे, एकनाथ खाडे, दत्ता केकरे, तानाजी केकरे, विलास ठवळे, उत्तम ठवळे, जीवन केकरे, समाधान केकरे, सुनील जाधव, विजय ठवळे, युवराज केकरे, आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.