नाथाभाऊ आता कुस्ती अर्धवट सोडू नका : गुलाबराव पाटील

खडसे-फडणवीस वादात शिवसेनेची उडी

Gulabrao Patil

नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा, कुस्ती अर्धवट सोडू नका असे आवाहन जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना केले आहे. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक युध्द असेच चालते, पण पुन्हा बंद पडते. हे युध्द कायम चालत राहीले पाहीजे. कोणतीही गोष्ट हातात घेतली म्हणजे ती धसास लावली पाहिजे असे सांगत फडणवीसांनी आमच्या उत्तर महाराष्ट्रातील एक ओबीसी नेता संपवला आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. या आरोपानंतर गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. जळगाव येथे बोलताना ते म्हणाले, एकनाथ खडसे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी नेत्यांना संपवण्याचे कारस्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने रचले आहे. मात्र, एकनाथ खडसे आरोप करतात आणि गप्प बसतात, आता खडसेंनी पुर्ण युध्द लढायला हवे. बोलायचे आण पुन्हा बंद करायचे, हे माझ्या स्वभावात बसत नाही. खडसेंनी आता आरपारची लढाई लढली पाहीजे. खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्व राहणार नाही. युध्द आणि कुस्ती कधीही अपूर्ण खेळायची नसते असेही पाटील म्हणाले.

मुंडेंच्या मृत्यूची चौकशी करावीशी का वाटली नाही ?

एकीकडे शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठया प्रमाणावर होत असताना त्याची सीआयडी चौकशीची मागणी कधी भाजपने केली नाही. इतकेच काय तर गोपीनाथ मुंडेंसारख्या बडया नेत्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी भाजपला का करावीशी वाटली नाही बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी असल्यानेच, असे राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.