घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या घड्याळाचा काटा अडकला

राष्ट्रवादीच्या घड्याळाचा काटा अडकला

Subscribe

ठाणे लोकसभा मतदार संघातील उमेदवाराचे नाव ठरेना

ठाणे लोकसभा मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडाळ्याचा काटा यंदा मात्र उमेदवार देण्यावरून अडकला आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाही अजून उमेदवार निश्चित न झाल्याने राष्ट्रवादीच्या गटात खळबळ माजली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघासाठी माजी खासदार संजीव नाईक की माजी पालकमंत्री गणेश नाईक यावर चर्चा होत असतांना निवडणुकीच्या रिंगणात कोणत्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी हे फक्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच ठरवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून स्पष्ट करण्यात आल्याने यावेळी नवीन चेहर्‍याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असता त्यासाठी अनेक पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरवात केली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजताच मतदार संघात मोर्चेबांधणी करायला सुरवात केली. शिवसेना-भाजप युतीचे जागावाटपावरून घोडे अडले असले तरी त्याचा फारसा परिणाम ठाणे मतदार लोकसभा मतदार संघावर पडणार नसल्याने विचारे यांनी प्रचारात गती घेतली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचा उमेदवार गुलदस्त्यातच असल्याने अखेर त्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार कधी आणि प्रचाराला सुरुवात होणार कधी? याची धास्ती पक्षातील पदाधिकार्‍यांना लागली आहे.

- Advertisement -

जर माजी खासदार संजीव नाईक यांनाच उमेदवारी दिली तर त्यांचा जुना अनुभव कामी येईल. त्याच जागी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांना उमेदवारी दिली तरी प्रचाराचा मार्ग सोपा जाईल मात्र त्याच वेळी नवीन चेहरा दिला तर यंदाची निवडणूकही जड जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची 3 तास बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीकडून गणेश नाईक यांचे नाव आघाडीवर होते. त्यांचे नाव निश्चित असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येणारी लोकसभा निवडणूक पाहता सर्वच पक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी देखील कामाला लागले आहे.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, तसेच गणेश नाईक, ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे, महापालिका विरोधीपक्ष नेते मिलिंद पाटीलसह ठाणे राष्ट्रवादीचे गटनेते हनुमंत जगदाळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला उपस्थित होते. यावेळी माजी खासदार संजीव नाईक यांच्या जागी गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यासाठी चर्चा रंगली होती. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात कोणत्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी हे फक्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच ठरवणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

ठाण्याप्रमाणे सर्व ठिकाणी अशा बैठका घेण्यात येणार असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले. शिवसेनेचे लोकसभा उमेदवाराबरोबर विधानसभा निवडणुकीसाठीही उमेदवार मैदानात असल्याने सेनेकडून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचे काम सध्या स्थितीत सुरु आहे. विधानसभा निवडणुका स्तरावर मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात येत असतानाच त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीतही होणार आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या हालचाली संथ गतीने सुरु असल्याने अखेर घडाळ्याच्या काट्याची टिक टिक कधी सुरु होणार याकडे आघाडीचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -