सिनेनिर्माते नाडियादवाला यांच्या पत्नीला NCB कडून अटक

film producer firoz nadiadwalas
चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला

बॉलिवूड चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नीला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. नाडियादवाला यांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आल्यानंतर ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नाडीयादवाला यांनाही समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. नाडियादवाला यांनाही सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

एनसीबीने नाडियादवाला यांच्या घरी छापा टाकल्यानंतर पत्नी शबाना सईद यांच्याकडे दहा ग्रॅम गांजा आढळून आला. दोनच दिवसांपूर्वी एनसीबीने वाहिद ऊर्फ सुल्तान नामक दलालास अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने ही कारवाई केली. शनिवारीच एनसीबीने मुंबईतील चार ठिकाणी छापेमारी करुन चार लोकांना अटक केली होती. त्यामध्ये ७१७ ग्राम गांजा, ७४.१ ग्राम चरस आणि ९५.१ ग्राम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

शबाना सईद यांना अटक करण्यापूर्वी एनसीबीने त्यांची कसून चौकशी केली. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या झाल्यानंतर तपास सुरु असताना बॉलिवूड आणि ड्रग्जचे संबंध समोर आले होते. त्यानंतर अनेक सेलिब्रिटी देखील एनसीबीच्या रडारवर आल्या. काही दिवसांपूर्वीच अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ अगिसिलाओसला देखील अटक करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वीच एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविकची ड्रग्ज प्रकरणात चौकशी केली होती. शौविक अद्यापही एनसीबीच्या कोठडीत आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, यांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे.