घरमहाराष्ट्रदादांनी मुख्यमंत्र्यांचा शिवसेना पक्ष फोडला!

दादांनी मुख्यमंत्र्यांचा शिवसेना पक्ष फोडला!

Subscribe

बारामतीत अजित पवारांच्या उपस्थितीत पाच शिवसेना नागरसेवकांना दिला प्रवेश

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीन पक्षांचे मिळून राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आणि एकमेकांचे लोकप्रतिनिधी न फोडण्याचा निर्धार करणार्‍या या सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचा पक्ष फोडल्याने भर पावसात मातोश्रीवर नाराजीचे ढग दाटून आलेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि ते सुद्धा थेट बारामतीत पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. या प्रवेशामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केली असून नगरमधील शिवसेनेचे नेते अनिल राठोड यांनी या प्रवेशाचा निषेध करत हा प्रवेश दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

महविकास आघाडी सरकार सत्तेवर येत असताना फोडाफोडीचे राजकारण करणार्‍यांना धडा शिकवण्याचा ‘धडा’ देणारे अजित पवार यांनी आपल्याच ‘धड्या’ला फाटा दिला की काय, अशी चर्चा सध्या नगरमध्ये सुरू आहे. पारनेर नगरपंचायतमधील फोडाफोडीमुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वात नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

- Advertisement -

आमदार नीलेश लंके यांनी शनिवारी बारामतीतील व्हीआयआयटीमध्ये अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर हे प्रवेश देण्यात आले. शिवसेनेचे नगरसेवक फोडणारे निलेश लंके हे सुद्धा मूळ शिवसेनेचे नेते असून हे सर्व नगरसेवक विधानसभा निवडणुकीपासून त्यांच्या संपर्कात होते.‘शिवसेना नगरसेवकांना अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीत यायचे होते. त्यांना आमच्या पक्षात घेतले नसते तर ते भाजपमध्ये गेले असते’, असे स्पष्टीकरण आमदार लंके यांनी दिले, तर राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो, अशी सारवासारव केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -