विधानसभेसाठी राष्ट्रवादीची लगीनघाई सुरु; इच्छुकांचे अर्ज मागवले

१ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची तर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत इच्छुक उमेदवारांची यादी अंतिम केली जाणार

Mumbai
NCP MLA Jayant Patil
मंत्री जयंत पाटील यांचे टिकास्त्र

लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसताच. राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लगीनघाई सुरु केली आहे. विधानसभा लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी पक्षाकडे दाखल करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आहे. पक्षाकडे १ जुलै २०१९ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे असून या अर्जांची छाननी ३ जुलै रोजी होऊन जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत इच्छुक उमेदवारांची यादी अंतिम केली जाणार आहे, असे पाटील सांगितले आहे.

किस्सा उमेदवारी अर्जाचा

पक्षांतर्गत लोकशाही आहे असे दाखविण्यासाठी प्रत्येक पक्ष अशाप्रकारे उमेदवारांचे अर्ज मागवत असतो. त्यानंतर सदर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येते. २०१४ साली राष्ट्रवादीने उमेदवारांना पाच हजार रुपयांचे प्रवेश शुल्क ठेवले होते. मात्र यावर्षी काही शुल्क असणार आहे का? याबाबत अद्याप तरी पक्षाने खुलासा केलेला नाही. २०१४ साली मतदारसंघनिहाय मुलाखती झाल्या होत्या. मुंबईच्या मागाठणे विधानसभा मतदारसंघासाठी प्रकाश सुर्वे यांनी मुलाखत दिली. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चितच होती. कारण त्याआधी दोन वेळा त्यांनीच या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तर झालं असं संध्याकाळी त्यांनी राष्ट्रवादीची मुलाखत दिली आणि दुसर्‍या दिवशी सकाळीच ते मातोश्रीवर कार्यकर्त्यांसहीत डेरेदाखल झाले. शिवसेनेत प्रवेश करत चक्क ते पहिल्यांदा आमदारही झाले. त्यामुळे यावर्षी देखील किती उमेदवार मोक्याच्या क्षणी अवलानघात करतील आणि किती नव्या लोकांना पक्ष संधी देईल? हे येणारा काळच सांगू शकेल.

पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठका

यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत. या बैठकांमध्ये शरद पवारसाहेबांनी सर्वांचे विचार ऐकून घेतले शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्या त्या जिल्हयाचा आढावाही घेतला. राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी, ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज १ जुलै २०१९ पर्यंत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात किंवा जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे असे आवाहनही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले आहे.