घरताज्या घडामोडीघड्याळवाले आमचे पार्टनर आहेत - उद्धव ठाकरे

घड्याळवाले आमचे पार्टनर आहेत – उद्धव ठाकरे

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच बारामतीला भेट दिली. बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्यवतीने ‘कृषिक २०२०’ आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले. या कृषिप्रदर्शानाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरचे शेतकरी दादासाहेब खोब्रागडे यांनी तांदळाच्या नवीन वाणाच्या शोधाचा किस्सा सांगितला. नवीन वाण शोधल्यानंतर खोब्रागडेंना त्या वाणाला काय नाव द्यावे, असा प्रश्न पडला. त्यांची नजर हातातील घड्याळ्याकडे गेली आणि त्यांनी एचएमटी हे नाव दिले. योगायोग असा की त्याच घड्याळवाले आज आमचे पार्टनर झाले आहेत.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “अभिमान वाटावे असे काम बारामतीमध्ये पवारांनी केले आहे. राजकारणातले मतभेद, मतभिन्नता आपल्याजागी, पण जे चांगले काम झाले आहे ते नाकारणे हा करंटेपणा होईल. त्यामुळे याचे श्रेय पवार कुटुंबियांना दिले पाहीजे. उजाड माळरानावर त्यांनी नंदनवन पिकवून दाखवले हे सोपे काम नाही.”

- Advertisement -

कृषिप्रदर्शनाच्या बाबतीत बोलताना ठाकरे म्हणाले की, सुरुवातील मला वाटले होते की इतर कृषिप्रदर्शनाप्रमाणेच स्टॉल वैगरे इथे लागले असतील. पण इथे वेगळेच चित्र पाहायला मिळते. अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने शेतीमध्ये विविध प्रयोग केल्याचे आज पाहायला मिळाले. इथे आलो नसतो तर मोठ्या अनुभवाला मुकलो असतो, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आपला देश कृषिप्रधान देश मानतो. मग शेतीवर आव्हान आले तर हात पाय गाळून जमणार नाही. लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे शेतीवर ताण येत आहे. आपण चंद्रावर जरी गेलो असलो तरी पाणी बनविण्याच्या तंत्रज्ञानाचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे कमीत कमी पाण्यात अधिक शेतीचे उत्पन्न घेण्याचे तंत्रज्ञान विकसित व्हायला हवे, असेही ठाकरे म्हणाले. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, पशू व दुग्धसंवर्धन मंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि बॉलिवूड अभिनेता आमिर खान उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -