कंगणाचं मानसिक संतुलन ढासळलंय; धनंजय मुंडे आक्रमक

ncp leader dhananjay munde slams kangana ranaut for her statement
कंगणाचं मानसिक संतुलन ढासळलंय; धनंजय मुंडे आक्रमक

मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल अभिनेत्री कंगणा रनौतनं केलेल्या वक्तव्यानंतर सर्वत्र संतापचं वातावरण निर्माण झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगणा विरोधात अनेक वक्तव्य केली जात आहेत. तसेच राज्यातलं राजकीय वातावरण देखील तापलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील कंगणा रनौतवर संताप व्यक्त केला आहे.

धनंजय मुंडेंनी कंगणाचा समाचार घेत म्हणाले की, ‘याच मुंबईने तुमच्या सारख्या अनेकांना आसरा दिला आहे, ग्लॅमर-करिअर दिलंय. एखादी व्यक्ती इतकं कृतघ्न दोनच परिस्थितीत वागू शकते, एकतर ती संस्कारानेच कृतघ्न घडलेली असते किंवा तिचे मानसिक संतुलन ढासळलेले असते.’

दरम्यान सध्या कंगणा आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सोशल मीडियावर वाक्-युद्ध सुरू आहे. मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला कंगणाने नकार दिला होता. मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे कंगणाने वक्तव्य केलं होत. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असे विधान केलं. त्याला कंगणाने असं प्रत्युत्तर दिलं की, ‘संजय राऊतांनी मला मुंबईत न येण्याची धमकी दिली. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणाऱ्या ग्रॅफिटी दिसल्या. आता तर मला उघड धमक्या येऊ लागल्या आहेत. ही मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?’असा तिनं सवाल करत मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. यानंतर संतापाच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. अजूनही कंगणा वादग्रस्त वक्तव्य ट्विटरच्या माध्यमातून करत आहे.


हेही वाचा – कंगणावर संजय राऊत म्हणाले, ‘मान्य नसणाऱ्यांनी त्यांचा बाप दाखवावा’!