राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा डॉ. भारती पवार भाजप प्रवेश करणार

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक जिल्हाध्यक्षा डॉ. भारती पवार उद्या (शुक्रवारी) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Mumbai
डॉ. भारती पवार

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता पक्षांतराला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा मतदारसंघातील माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजिव रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक जिल्हाध्यक्षा डॉ. भारती पवार यासुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिंडोरी लोकसभेसाठी भारती पवार यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र त्यांच्याऐवजी धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्या नाराज होत्या. या नाराजीतूनच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता राष्ट्रवातीच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

सत्ताधारी भाजपने २०१४ साली इतर पक्षातील नाराजांना आपल्या बाजुला वळवून अनेक जागा जिंकल्या होत्या. त्याचप्रकारची निती या निवडणुकीतही अवलंबली असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी दक्षिण अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता विजयसिंह मोहीते पाटील यांनीही देखील माढासाठी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार आहेत. तर दिंडोरीमधून आता डॉ. भारती पवार या भाजपमध्ये जात आहेत. मात्र सुजयप्रमाणे पवार यांना दिंडोरी लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भारती पवार यांना जाऊबाईंचा विरोध

डॉ. भारती पवार या शरद पवार यांचे एकेकाळचे निकटवर्तीय समजले जाणारे दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या सून आहेत. सध्या नाशिकच्या त्या जिल्हा परिषदेच्या सदस्या देखील आहेत. दिंडोरी मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. भारती पवार या सुरुवातीपासूनच उमेदवारीसाठी इच्छुक मानल्या जात होत्या. मात्र त्यांच्या परिवारातूनच त्यांना विरोध होत होता. भारती पवार यांच्या जाऊबाई जयश्री पवार या नाशिक जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा आहेत. जयश्री पवार आणि त्यांचे पती नितीन पवार यांनी भारती पवार यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. २०१२ साली जेव्हा नाशिक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडण्याची वेळ आली तेव्हा देखील जाऊबाईंमध्ये संघर्ष झाला होता. शेवटी छगन भुजबळ यांनी जयश्री पवार यांना अध्यक्षपद बहाल केले होते. त्याची सल अजूनही भारती पवार यांच्या मनात आहे.

भाजप हरिश्चंद्र चव्हाणांना डावलणार का?

डॉ. भारती पवार यांनी २०१४ साली देखील दिंडोरीतून निवडणूक लढवली होती. मात्र भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्यांचा साडे तीन लाखाच्या मताधिक्यांने त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी दिंडोरी विधानसभेचे माजी आमदार धनराज महाले यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. धनराज महाले यांनी शिवसेनेचे शिवबंधन सोडून नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.  २०१४ च्या निवडणुकीत साडे पाच लाख मतं घेणाऱ्या हरिश्चंद्र चव्हाण यांना डावलून भाजप भारती पवार यांना उमेदवारी देणार का? हे आता काही दिवसांत स्पष्ट होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here