लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे – जयंत पाटील

Mumbai
Jayant Patil and Narendra Modi

जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा विचार करता, देशातील लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री ८ वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्रीपासून २१ दिवसासाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र जनतेला जास्त संभ्रमावस्थेत ठेवले असल्याने जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जीवनावश्यक गोष्टींच्याबाबत पंतप्रधानांच्या घोषणेमध्ये स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. देश एका संकटाला तोंड देत असताना देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अपुरी माहिती दिल्याने, देशात अनागोंदी निर्माण झाली आहे. परंतु, महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात गेले दोन दिवस लॉकडाऊन सुरूच आहे. पुढील काळातही जनतेच्या सर्व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. हे सरकार जनतेला जीवनावश्यक सुविधांच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासनही जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेला दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊन असला तरी लोकांना जीवनावश्यक सेवा, अत्यावश्यक सेवा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लोकांनी उगाचच दुकानांमध्ये गर्दी करु नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here