विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटलंय – रोहित पवार

ncp mla rohit pawar

जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करत अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी जो बायडेन यांचे ट्विट करत अभिनंदन केले आहे. यावेळी अभिनंदन करताना बिहार निवडणुकीवर देखील भाष्य केले आहे. अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून असाच बदल बिहारमध्ये दिसेल. शिवाय, विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटलंय, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.

जो बायडेन यांचे अभिनंदन करताना अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असल्याचे म्हटले आहे. “अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे,” असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

दरम्यान, अमेरिकेप्रमाणे बिहारमध्येही सत्तांतर होणार असल्याचे संकेत आहेत. एक्झिट पोलमध्ये राजदचे तेजस्वी यादव सर्वात पुढे पाहायला मिळत आहेत. यावर देखील रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे. “बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्सिट पोलवरून दिसतंय. याचाच अर्थ सकारात्मक राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय. त्यामुळं आता यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा,” असा टोला लगावला.