शरद पवारांच्या हाती कवड्यांची माळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे ट्विट केलेला फोटो झाला व्हायरल

शरद पवारांच्या याच फोटोमुळे चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणी दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात त्यांच्या हाती कवड्याची माळ असलेला एक फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेअर केला आहे. कोल्हे यांनी ट्विट केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून त्यावरून उलटसुलट चर्चा रंगली आहे.

शरद पवार यांनी रविवारी तुळजापूरमध्ये जाऊन अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी केली. तिथे त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यांना धीर दिला. त्यांच्या या पाहणी दौर्‍याचे फोटो कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत. त्यातील फोटोंमध्ये शरद पवारांच्या हाती कवड्याची माळ दिसत आहे. खुद्द अमोल कोल्हे यांनी ही गोष्ट निदर्शनास आणतानाच पवारांच्या हातातील माळेचे महत्त्वही सांगितले आहे.

आपल्या ट्विटमध्ये कोल्हे म्हणतात, ‘ही हातातील माळ खूप काही सांगते… हे प्रतीक आहे जिद्दीचे, विश्वासाचे, दिल्लीश्वराला आव्हानाचे, शून्यातून स्वराज्य निर्मितीचे, लोककल्याणाचे आणि रयतेच्या निर्व्याज प्रेमाचे!’ अर्थात, पवारांच्या हाती ही माळ कशी आली? ती त्यांनी जाणीवपूर्वक हातात ठेवली होती की मराठवाड्यातील दौर्‍यादरम्यान कुणी त्यांना ही माळ भेट दिली होती, याविषयी काहीही समजू शकलेले नाही.