‘माझ्या बापानं रक्त गाळून पक्ष बांधलाय’; संतापात सुप्रिया सुळेंनी सुनावलं!

Paithan
Supriya Sule in Lok sabha Speech
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बेधडक आणि शीघ्रकोपी स्वभावासाठी परिचित आहेत. मात्र, त्याउलट सुप्रिया सुळे वादामध्ये संयमी भूमिका मांडताना दिसतात. पण नुकत्याच पैठणमध्ये झालेल्या एका सभेमध्ये सुप्रिया सुळेंचा संताप सगळ्यांना पाहायला मिळाला. या सभेमध्ये आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर भडकलेल्या सुप्रिया सुळेंनी थेट कार्यकर्त्यांना दमच भरला. ‘माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून हा पक्ष उभा केलाय. त्याला गालबोट लावाल तर याद राखा’, असा दम सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना भरला आहे. पण नेहमी शांत असणाऱ्या सुप्रिया सुळेंना इतकं भडकायला नक्की झालं काय होतं?

काय आहे प्रकार?

पैठणमध्ये सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यांचं भाषण सुरू असताना संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या कार्यकर्त्यांनी आमनेसामने येत घोषणाबाजी करत कार्यक्रमात गोंधळ घातला. त्यामुळे सुप्रिया सुळेंना त्यांचं भाषण देखील आटोपतं घ्यावं लागलं. या वादानंतर सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांमध्ये सुनावलं. ‘तुम्हाला तुमच्या पक्षाचा अभिमान नसेल. पण माझ्या बापानं रक्त गाळून हा पक्ष उभा केला आहे. हे तुम्ही छापलं तरी चालेल. आदरणीय पवार साहेब ८० वर्षांचे आहेत. रक्त गाळून, घाम गाळून पवार साहेबांसोबत असंख्य कार्यकर्त्यांनी हा पक्ष बांधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्त्याने त्याला गालबोट लावायचा प्रयत्न केला, तर गाठ या सुप्रिया सुळेशी आहे’, असं त्या म्हणाल्या.

‘अशा प्रकारची हुल्लडबाजी मी पहिल्यांदाच पाहिली. असे प्रकार मी खपवून घेणार नाही. मी कुठल्या बापाची लेक आहे हे समजून घ्या. ही बैठक माझ्यासाठी कायम कटू आठवणीत राहील’, असं देखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.