‘आमचं सरकार आल्यावर तात्काळ कर्जमाफी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार’

अजित पवार यांनी मंगळवारी पार पडलेल्या सभेत सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच अजित पवार यवतमाळ जिल्हावासियांना आवाहन देखील केलं आहे.

Maharashtra
ncp shivswarajya yatra in ajit pawar says promise loan waiver if comes in power
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार

शिवस्वराज्य यात्रेचा बुधवारी तिसरा दिवस असून दुसरी सभा पुसद येथे पार पडली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यावेळी अजित पवार यांनी असं आश्वासन दिलं की,आमचं सरकार आल्यावर तात्काळ कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही. हे शेतकऱ्यांचे सरकार नाही तर मुठभर लोकांचे सरकार आहे. सत्तेत असून शिवसेना मोर्चा काढते लोकांना दुधखुळे समजता का?, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.

तसेच अजित पवार म्हणाले की, ‘कुठल्या दिशेने राज्य चालल आहे. वसंतराव नाईक सुधाकर नाईक, शरद पवार यांनी राज्याला दिशा दिली परंतु यांनी राज्य कंगाल करुन टाकले आहे. या सरकारने पाच वर्षांत किती शेतकऱ्यांचे सातबारा कोरा केला ते जाहीर करावे’, असं जाहीर आव्हान अजित पवार यांनी सरकारला दिले.

नक्की वाचा जी स्वप्न दाखवली ती पूर्ण करण्यात सरकार अपयशी – अजित पवार

‘मोठमोठ्या कंपन्या बंद होत आहेत. अनेक उद्योग बंद होत आहेत. कामगार बेकार होत आहेत. मात्र वाचाळवीर काहीही बोलत आहेत. राज्यात अस्वस्थता आहे. चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. राज ठाकरे यांची चौकशी होत आहे. पी चिदंबरम यांचीही चौकशी केली जात आहे. करा चौकशी परंतु ज्यापध्दतीचे राजकारण केले जात आहे हे योग्य नाही’, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी सभेत सरकारवर घणाघाती आरोप करताना असं म्हणाले की, ‘कृषिप्रधान राज्य करण्याचे काम सुधाकर नाईक यांनी केलं आहे. पुरग्रस्त परिस्थितीला देवेंद्र फडणवीस आणि येडियुरप्पा यांचे सरकार जबाबदार आहे.’

‘यवतमाळ जिल्हयात सात जागा आहेत, तुम्ही त्या निवडून आणू शकता. या अगोदरचा इतिहास मी विसरलो नाही याची आठवण अजित पवार यांनी यवतमाळ जिल्हावासियांना करुन दिली. या राज्याला मजबुत, कणखर, शब्द पाळणारं, तरुणांना अठरापगड जातीतील लोकांना काम देणारं, गोरगरीबांचे, रयतेचे राज्य आणुया’, असं अजित पवारांनी यवतमाळ जिल्हावासियांना आवाहन केलं.

या सभेत खासदार अमोल कोल्हे यांनी देखील सरकारवर आरोप केला. ‘शेतकऱ्यांची कधीच कुणी थट्टा केली नाही एवढी क्रुर थट्टा या भाजप सरकारने केली आहे. सत्ताधाऱ्यांची जनतेशी काय बांधिलकी आहे हे पुरग्रस्त भागातील जनतेला केलेल्या कामावरून लक्षात येत आहे. पीक विम्यात कापुस का नाही तर हेक्टरी ४२ हजार रुपये द्यावे लागतील म्हणून?’, असा सवाल खासदार अमोल कोल्हेनी सरकारला केला.

‘यापुर्वी एमपीएससीद्वारे भरती होत होती परंतु आता ७२ हजार मेगाभरती केली जाणार आहे. ती मध्यप्रदेशमधील व्यापम घोटाळा केलेल्या त्या कंपनीकडे देण्यात आली आहे. आता काय होणार आहे हे लक्षात घ्या’, असा गौप्यस्फोट डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार ख्वाजा बेग, आमदार मनोहर नाईक,आमदार प्रदीप नाईक, माजी आमदार राजू तिमांडे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, डॉ. शैलेश मोहिते आदींसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


हेही वाचाआचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्यातील पूरग्रस्तांना मदत द्या