महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री? जयंत पाटलांची युतीवर खोचक टीका!

एकीकडे सेना-भाजपचे नेते आणि खुद्द मुख्यमंत्री देखील पुन्हा भाजपचाच नारा देत असताना मुख्यमंत्रीपदाचे दावे मात्र दोघांकडून केले जात आहेत. यावरच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

Pune
NCP leader Jayant Patil

एकीकडे भाजपच्या विशेष कार्यसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री ‘पुन्हा मीच येणार’चा पुनरुच्चार करत असतानाच दुसरीकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार निवडीची तयारी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युतीवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार पुढे येत आहे. आजपर्यंत राज्यात आपण दोन मुख्यमंत्री पाहिले नाहीत’, असा टोमणा जयंत पाटील यांनी मारला. तसेच, ‘गेल्या साडेचार वर्षांमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. मात्र, त्यांच्यावर अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकरणाची चौकशी किंवा विधीमंडळामध्ये अहवाल ठेवण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत’, असं देखील जयंत पाटील यावेळी म्हणाले.


हेही वाचा – मुख्यमंत्री म्हणतात ‘मी पुन्हा येणार’, मग शिवसेनेला काय?

वंचितला पत्र, मनसेबाबत विचार नाही!

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पुण्यात पार पडली. यावेळी राज्यातल्या सर्व २८८ मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. येत्या २३ ते २५ जुलै या तीन दिवसांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. यावेळी सर्व मतदारसंघांमधून आलेल्या अर्जांचा आढावा घेऊन त्यांच्यातील योग्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. दरम्यान, ‘काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांसोबत जागावाटपाबाबत पुढच्या आठवड्यात चर्चा होईल, त्यावेळी साधारणपणे २२० जागांचं वाटप होईल’, अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी दिली. तसेच, ‘वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामील होण्यासंदर्भात पत्र दिले असून मनसेबाबत आम्ही कोणताही विचार केलेला नाही’, असं देखील पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ आदी नेते या बैठकीला हजर होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here