सोमवारी ठरणार विरोधी पक्षनेता आणि उपसभापती

Mumbai
Vijay Wadettiwar and Neelam Gorhe
विधानसभेच्या विरोधी पक्षनेते आणि विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची सोमवारी निवड होणार

विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना एका टर्ममध्ये विधानसभेत तिसर्‍यांदा विरोधी पक्षनेता निवडण्याची वेळ विरोधकांवर आली आहे. सोमवारी विरोधी पक्षनेता निवडीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर याच दिवशी विधानपरिषदेत उपसभापतीची देखील निवड होईल, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभेत काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेता तर विधानपरिषदेतील उपसभापतीपद शिवसेनेच्या वाट्याला गेले असून त्या पदावर निलम गोर्‍हे यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिकामे आहे. काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला. मात्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा ’यथावकाश’ करु, असे सांगितले. त्यामुळे शेवटच्या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता मिळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. विरोधक म्हणतील तेव्हा विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करू, हे विरोधकांच्या ‘हातात’ आहे, असे मुख्यमंत्र्यांनी गुरुवारीच सभागृहात विरोधकांना सांगितले होते. त्यांचा म्हणण्याचा उद्देश थेट विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर करावी, असा होता.

आकड्यांवर नजर टाकली असता संख्याबळ युतीच्या बाजूने दिसत आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर होताच, जर काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर अपक्षांना घेऊन अटीतटीची निवडणूक होऊ शकते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठीच विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा अडवून ठेवल्याची चर्चा आहे.