घरताज्या घडामोडीकर्करोग रुग्णांना मिळणार वेदनांपासून मुक्ती

कर्करोग रुग्णांना मिळणार वेदनांपासून मुक्ती

Subscribe

आयआयटीची नवी उपचार पद्धती

कर्करोग रुग्णांवर शस्त्रक्रिया, किमोथेरपी किंवा रेडिऐशन थेरपीच्या माध्यमातून उपचार केले जातात. या विविध उपचार पद्धतीमध्ये रुग्णांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. त्यांचा चेहराही विद्रुप दिसू लागतो. त्यामुळे रोगापेक्षा इलाज जालीम म्हणण्याची वेळ रुग्णांवर येते. परंतु आता या वेदनांतून कर्करोग रुग्णांची सुटका होणार आहे. आयआयटी मुंबईतील संशोधकांनी कर्करोगग्रस्तांना दिलासा देणारी नवी उपचार पद्धती विकसित केली आहे. यामुळे उपचार घेताना रुग्णांना कोणत्याही वेदना होणार नाहीत. यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढून त्याचा फायदा त्यांना होणार आहे.

कर्करोगावरील उपचार हा अत्यंत त्रासदायक आणि महागडा असल्याने रुग्णांना शारीरिक त्रासाबरोरबच आर्थिक भारही सोसावा लागतो. कर्करोगावरील उपचारासाठी शस्त्रक्रिया, किमोथेरपी किंवा रेडिऐशन या उपचारपद्धतीचा अवलंब केला जातो. परंतु या उपचार पद्धतीमध्ये रुग्णांना प्रंचड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्यातच ही उपचार पद्धती महागडी असल्याने सर्वसामान्यांना ती परवडत नाही. त्यामुळे भारतातील अनेक रुग्णांचा उपचाराविना मृत्यू होतो. ही बाब लक्षात घेऊन आयआयटी मुंबईमधील बायोसायन्स अ‍ॅण्ड बायोइंजिनियरिंग विभागाचे प्राध्यापक राहुल पुरवार व त्यांच्या टीमने कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करणार्‍या रोगप्रतिकारक पेशींमध्ये सुधारणा केली आहे. यासाठी त्यांनी जीन थेरपी व सेल थेरपी एकत्र करून रोगप्रतिकारक पेशींच्या शक्तीमध्ये वाढ केली आहे.

- Advertisement -

कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष पेशींना ‘टी सेल’ असे नाव देण्यात आले आहे. या पेशी कर्करोग आणि ट्युमरची वाढ रोखण्यासाठी मदत करतात. परंतु नव्याने बनवण्यात आलेल्या पेशींना ‘सीएआर टी-सेल’ असे नाव देण्यात आले आहे. या पेशी शरीरातील कर्करोगाच्या पेशी शोधून त्या नष्ट करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे प्रोफेसर गौरव नरुला यांच्या सहकार्‍याने लवकरच या थेरपीची निदान चाचणी सुरू करण्यात येणार आहे.‘सीएआर टी-सेल’संदर्भात 2017 मध्ये पहिल्यांदा यावर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये सीएआर टी-सेल

तंत्रज्ञान उपचारांसाठी खूप आशादायक असल्याचे स्पष्ट झाले होते. परदेशामध्ये उपलब्ध असलेल्या ‘टी सेल’ उपचार पद्धतीसाठी रुग्णांना कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. भारतामध्ये ही उपचार पद्धती अद्यापही उपलब्ध नाही. परंतु खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास हे तंत्रज्ञान आयात करून भारतीय रुग्णांना ते उपलब्ध करून देता येईल. आयात केलेली ही उपचार पद्धती भारतीय रुग्णांना 35 लाखांमध्ये उपलब्ध होऊ शकते. परंतु प्रा. पुरवार यांनी विकसित केलेल्या ‘सीएआर टी-सेल’ ही अवघ्या 15 लाखांमध्ये रुग्णांना उपलब्ध होणार आहे. ही उपचार पद्धती समाजातील मोठ्या वर्गाला परवडणारी असल्याने त्याचा मोठा फायदा कर्करोग रुग्णांना होणार आहे, अशी माहिती प्रा. पुरवार यांनी दिली.

- Advertisement -

टाटा हॉस्पिटलमध्ये चाचणी करण्यासाठी व उपचार पद्धतीला मान्यता मिळवण्यासाठी हे संशोधन ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) सादर करण्यात येणार आहे.

ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाकडून मान्यता मिळाल्यानंतर 2020 च्या मध्यापर्यंत चाचणीला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच ही उपचार पद्धती रुग्णांना उपलब्ध होण्यासाठी दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे.
– प्रा. राहुल पुरवार, बायोसायन्स अ‍ॅण्ड बायोइंजिनियरिंग विभाग, आयआयटी

जीवनदायी ड्रग्ज
परदेशात वापरात असलेल्या ‘टी सेल’ उपचार पद्धतीला जीवनदायी सेल असे म्हटले जात असले तरी ‘सीएआर टी-सेल’ला जीवनदायी ड्रग्ज असे म्हटले जाते. ‘सीएआर टी सेल’ हे शरीरातील कर्करोगाच्या पेशी ओळखून त्या नष्ट करतात. त्यामुळेच त्यांना जीवनदायी ड्रग्ज म्हटले जाते. प्रा. पुरवार व त्यांचे सहकारी सहा वर्षांपासून या उपचार पद्धतीवर काम करत आहेत. यासाठी त्यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचेही सहकार्य घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -