घरमहाराष्ट्रविधान परिषद निवडणूक निकाल : भाजपचे निरंजन डावखरे विजयी

विधान परिषद निवडणूक निकाल : भाजपचे निरंजन डावखरे विजयी

Subscribe

कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या संजय मोरे यांचा पराभव करत विजय मिळवला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला होता.

विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अखेर भाजपचे निरंजन डावखरे विजयी झाले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांनी ३२,८३१ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या संजय मोरे यांचा २९८८ मतांनी पराभव केला असून अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत बाजी मारली. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत सर्व १२ उमेदवार बाद झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकवरील संजय मोरे यांची २४,७०४ मतं ट्रान्सफरसाठी घेण्यात आली. त्यातील २६४० मतं निरंजन डावखरे यांना मिळाली. तर २२,०६४ मतं बाद ठरली. त्यामुळे निरंजन डावखरे यांच्या मतांचे मूल्य ३२,८३१ इतके झाले. विजयासाठी आवश्यक कोटा ३५,१४३ इतका होता. मात्र निरंजन डावखरे रिंगणात उरलेले एकमेव उमेदवार असल्यामुळे वरील अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी जाहीर केले. आयोगाच्या निर्णयानुसार अंतिम निकालात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या परवानगीने आज सकाळी पावणे सात वाजता याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

niranjan davkhare
भाजपचे निरंजन डावखरे विजयी घोषित

अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. दररोज डावखरेसाहेबांची आठवण येते.
– निरंजन डावखरे,भाजप, विजयानंतरची प्रतिक्रिया

आकडेवारीत चढाओढ

मतमोजणीच्या सुरूवातीला संजय मोरे हे २००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते. मात्र, तिन्ही उमेदवारांमध्ये मतांचे अंतर खूप कमी होते. पहिल्या फेरीत डावखरे हे आघाडीवर राहिले. पहिल्या फेरीत डाखरेंना १०,३०४ मोरेंना ९,४९४ मते मिळाली होती. तर दुसऱ्या फेरीनंतर डावखरे यांना ११,१८० आणि मोरे यांना ८,९९७ मते मिळाली होती. तिसऱ्या फेरीत त्यांना २८,९४५ तर मोरेंना २३,२११ मते मिळाली. या फेरीत डावखरे हे ५,७३४ मतांनी आघाडीवर होते. मात्र कोटा पूर्ण करण्यासाठी अपेक्षित असलेली मतं न मिळाल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत सुमारे अडीच हजाराहून अधिक मतं बाद ठरली. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ७३.८९ टक्के इतके मतदान झाले होते.

- Advertisement -

एेनवेळी भाजपात प्रवेश

niranjan-davkhare-join-bjp
निरंजन डावखरेंचा भाजप प्रवेश (सौजन्य-एचटी)

निवडणुकीच्या काही दिवसापूर्वीच निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून डावखरेंनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावखरेंच्या उमेदवारीची घोषणा केली होती. डावखरेंच्या पक्ष बदलानंतर राष्ट्रवादीसाठी देखील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती. मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -