घरमहाराष्ट्रडोंबिवली स्कायवॉकवरील शेडसाठी कोट्यावधीचा खर्च, पण सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत

डोंबिवली स्कायवॉकवरील शेडसाठी कोट्यावधीचा खर्च, पण सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत

Subscribe

डोंबिवली रेल्वे स्थानक येथील स्कायवॉकवरील शेडसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु, या स्कायवॉकवर सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. केडीएमसीच्या अधिकाऱ्यावर स्कायवॉकवर झालेल्या हल्ल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या डोंबिवली स्कायवॉकवर सीसीटीव्ही कॅमेरेच नसल्याची बाब उजेडात आली आहे. पालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर स्कायवॉकवर झालेल्या हल्ल्यानंतर ही बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीच्या स्कायवॉकवरील शेडसाठी कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात आला. पण सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नसल्याने डोंबिवलीकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्कायवॉकवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी रामनगर पोलिसांनी पालिकेकडे केली आहे. मात्र पेालिसांच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचेच समोर आलं आहे.

तीन कोटी रुपयांची शेड

डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा स्कायवॉक हा २००४ साली बांधण्यात आला. या पुलाची लांबी सुमारे पाचशे मीटर आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरणारी गर्दी ही याच पुलावरून बाहेर पडते. त्यामुळे या पुलावर दररोज लाखो प्रवाशांची सतत वर्दळ सुरू असते. रेल्वे स्थानकात एकाच वेळी दोन ते तीन लोकल आल्यानंतर गर्दीच्या लोंढयातून प्रवांशाना पुलावरून चालणेही कठिण होऊन जाते. त्यातच पुलावर बसणारे फेरीवाले यातून कसाबसा मार्ग काढीत प्रवाशांना घरची वाट धरावी लागते. स्कायवॉकवर शेड नसल्याने प्रवाशांना ऊन पावसाचा मारा सहन करावा लागत होता. अशावेळी प्रवासी पुलावरच थांबून राहत असल्याने प्रचंड गर्दी होत असे. प्रवाशांच्या मागणीनंतर पुलावर शेड उभारण्यात आली आहे. जर्मन तंत्रज्ञान आणि टेन्साईल फेब्रीक्स मटेरियल वापरून उष्णता प्रतिबंधक आणि आग प्रतिबंधक तसेच वजनाने हलकी अशी ही शेड आहे. यासाठी सुमारे साडेतीन कोटी रूपये खर्च करण्यात आले आहे.

- Advertisement -

…तर हल्लेखोर कॅमेऱ्यात कैद झाले असते

कल्याण, ठाण्यानंतर सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून डोंबिवली ओळखले जाते. लोकलमधून लाखो प्रवाशांचे लोंढे स्थानकावर उतरत असतात. बहुतांशी प्रवासी हे डोंबिवली स्कायवॉकवरूनच बाहेर पडतात. लाखो प्रवासी पुलावरून ये-जा करीत असल्याने सतत वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसी कॅमेरे लावणे गरजेचे आहे. पण याकडे पालिकेने कानाडोळा करीत शेडसाठी कोट्यावधी रूपये खर्च केल्याचे समोर आलंय. पालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर डोंबिवली स्कायवॉकवर प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. मात्र स्कायवॉकवर सीसीटीव्ही कॅमेरे असते तर हल्लेखोर कॅमेऱ्यात कैद झाले असते. त्यामुळे पोलिसांना हल्लेखोरांपर्यंत पोहचणे सुलभ झाले असते, असाही सूर व्यक्त हेात आहे. लाखो प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

डोंबिवली स्कायवॉकवर सीसी कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी गेल्या दोन वर्षापूर्वीच पोलिसांनी केडीएमसीकडे केली आहे. डोंबिवली हे वर्दळीचे ठिकाण आहे. त्यामुळे सीसी कॅमेरे असणे खूपच गरजेचे आहे. पालिकेच्या अभियंत्यावर हल्ला झाल्या सीसी कॅमेरे असते तर हा प्रकार कॅमे- यात कैद झाला असता. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसी कॅमेरे लावणे गरजेचे आहे.
– विजयसिंग पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामनगर

 

- Advertisement -

स्मार्ट सिटीत कॅमेऱ्याचे जाळं?

कल्याण डोंबिवली शहराचे नाव स्मार्ट सिटी यादीमध्ये समावेश झाले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातून १ हजार ४०० कोटीचा निधी मंजूर झाला आहे. विविध प्रकल्प उभारले जाणार आहे. स्मार्ट सिटीत पुण्याप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे कल्याण डोंबिवलीत उभारण्यात येणार आहे. मात्र याला खूपच कालावधी जाणार आहे. त्यामुळे तोपर्यंत महत्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -