पुणेकरांनो लग्न करताय? विवाह समारंभासाठी नवे आदेश जाहीर

पुणे जिल्हा प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागात विवाह समारंभांसाठी नव्याने आदेश जाहीर केले आहेत.

no more than 50 guests allowed in marriage in pune strict social distancing norms to be followed
लग्न

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर पुणे शहरात कोरोना विषाणूचा विळखा अधिक वाढताना दिसत आहे. दरम्यान, पुण्यात कोविड-१९ च्या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागात विवाह समारंभांसाठी नव्याने आदेश जाहीर केले आहेत. महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी ‘मिशन बिगेन अगेन’चा भाग म्हणून जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगानेच नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

नागरिकांनी आणि मंगल कार्यालयांच्या मालकांनी कार्यक्रमस्थळी फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमावलीची कडक अंमलबजावणी होत आहे की नाही याची खात्री करावी, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे ५० पेक्षा अधिक पाहुण्यांना विवाह समारंभांला हजेरी लावता येणार नाही, यामध्ये स्वयंपाकी, वेटर्स आणि सांगितिक कार्यक्रम करणारे कलाकार यांचाही समावेश असणार आहे. विशेष म्हणजे विवाह सारंभाच्या आयोजकांनी कार्यक्रमाचे व्हिडीओ चित्रिकरण करुन पुढील पाच दिवसांत ते पोलीस स्टेशनमध्ये जमा करणे अनिर्वाय आहे. त्याचबरोबर आयोजकांना कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्यांची यादीही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनुसार बंधनकारक आहे.

विवाह समारंभाच्या ठिकाणी पोलीस पाटील, ग्राम सेवक, तलाठी आणि पोलिसांनी भरारी पथके नेमून कार्यक्रमस्थळी भेट देऊन संबंधित ठिकाणी नियमांचे पालन केले जात आहे किंवा नाही याची खात्री करावी. जर नियमांचे पालन केले गेले नसेल तर या भरारी पथकाने पोलिसांत तक्रार दाखल करावी’. – राजेश देशमुख; पुणे जिल्हाधिकारी

ही आहे नवी नियमावली

  • जास्तीत जास्त ५० लोकांनाच लग्न समारंभांना हजेरी लावता येईल. या लोकांना एकमेकांमध्ये ६ फुटांचं अंतर राखणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर फिजिकल डिस्टंसिंगचं योग्य प्रकारे पालन होत आहे किंवा नाही याची पाहणी करण्याचं काम दोन व्यक्तींवर सोपवण्यात यावं.
  • ५० लोकांची यादी (फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स, सांगितिक कार्यक्रम करणारे कलाकार, निवेदक यांच्यासह) स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जमा करणे, त्याचबरोबर सर्व निमंत्रक (भटजी, वाजंत्री, वेटर्स) यांनी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे.
  • कार्यक्रमस्थळी मद्य सेवन आणि गुटखा, पान मसाला खाण्यास परवानगी नाही. हे पदार्थ खाऊन कार्यक्रमस्थळी थुंकल्यास दंडनीय गुन्हा असेल.
  • वातानुकुलीत व्यवस्था कार्यक्रमस्थळी वापरता येणार नाही.
  • कार्यक्रमातील खुर्च्या, टेबल, किचन, जेवणाची जागा, वॉशरुम्स हे सातत्याने निर्जंतुक करण्यात यावेत.
  • जर कार्यक्रमस्थळी नियमांचा भंग झाल्याचे आढळल्यास लग्नाचा हॉल किंवा इतर जागा जिथे कार्यक्रमाचे आयोजन केले असेल तो तात्काळ बंद करण्यात येईल.
  • लग्न समारंभाचे चित्रिकरण करण्यात आलेली सीडी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये कार्यक्रमानंतर पाच दिवसांच्या आत जमा करावी.

    हेही वाचा – जीडीपीचे आकडे धोक्याची घंटा, अर्थव्यवस्था आणखी रसातळाला जाणार; रघुराम राजन यांचा इशारा