Corona Crisis: करोनाविरोधात आयुर्वेद, युनानी डॉक्टर सज्ज

Mumba
ayurveda unani doctor

जागतिक स्तरावर महामारीचे भीषण स्वरुप घेतलेल्या करोनाची लागण आता शहरी भागाकडून ग्रामीण भागाकडे सरकत आहे. ग्रामीण भागात करोनाची लागण वाढल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन करोनाचा सामना करण्यासाठी राज्यातील ६० हजारपेक्षा अधिक आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांची टीम सज्ज झाली आहे. करोनाविरोधात लढा देण्यासाठी हे डॉक्टर जनजागृती कार्यक्रम, प्राथमिक उपचार, मार्गदर्शन व समुपदेशन या कामामध्ये सरकारी यंत्रणेला मदत करणार आहेत.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. सरकार जनजागृती, लोकशिक्षण, प्रतिबंधात्मक उपाय, जमावबंदी यासारख्या सर्व आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे वापर करत आहे. मात्र मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांमध्ये संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात रोजगार व शिक्षणासाठी गेलेले नागरिक गावांकडे परतत आहेत. त्यांच्या माध्यमातून हा संसर्ग खेड्यापर्यंत पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. खेड्यापर्यंत करोना पसरल्यास सरकार आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ अपुरे पडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील ६० हजारपेक्षा अधिक आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांनी गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर करोनाचा सामना करण्याचा निर्णय घेतला आहे.

६० हजार आयुर्वेद व युनानी डॉक्टरांपैकी अनेकांना ॲलोपॅथी आणि आयुर्वेद किंवा युनानी अशा दोन्ही चिकित्सा पद्धतीचा म्हणजेच इंटिग्रेटेड मेडिसिन वापरण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामीण, दुर्गम, आदिवासी आणि शहरी भागातील सार्वजनिक व खाजगी आरोग्य व्यवस्थेत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे हे आयुर्वेदिक व युनानी डॉक्टर सरकारी यंत्रणेसह काम करण्यास सज्ज झाले आहेत.

राज्यामध्ये भारतीय चिकित्सापद्धती (आयुर्वेद, युनानी) च्या वैद्यकीय व्यवसायींची नोंदणी व नियमन हे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या माध्यमातून केले जाते. सध्या ६० हजारपेक्षा अधिक आयुर्वेद व युनानी डॉक्टर राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात सेवा देत आहेत. यातील काही सरकारी क्षेत्रात असून ते विविध हॉस्पिटलच्या माध्यामातून करोनाविरोधी मोहिमेत सहभागी झाले आहेत. तर खासगी क्षेत्रात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनाही करोनाविरोधात लढा देण्याचा निर्णय घेत सरकारची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी दिली. तसेच परिषदेकडून करोनाविरोधात आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

आयुर्वेद, युनानी क्षेत्रातील अनेक संघटना व डॉक्टर्स यांनी संपर्क साधून करोनाशी लढा देण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत मनोदय व्यक्त केला होता. त्यानुसार आम्ही तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात आम्ही पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पत्र लिहून भारतीय चिकित्सा पद्धतीच्या वैद्यकीय व्यवसायींचे योगदान देण्याबाबत कळवले आहे. – डॉ. आशुतोष गुप्ता, अध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, मुंबई

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here