आता खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

Mumbai
आंदोलन

वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय कामय ठेवावा या मागणीसाठी तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात शनिवारी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी कार्टर रोड येथे आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी कार्टर रोडच्या दुतर्फा उभे राहून फलकबाजी करत सरकारचा निषेध केला. मराठा वैद्यकीय प्रवेश आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या तरुणांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारले होते.

आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने प्रवेशप्रक्रिया स्थगित करत आरक्षणाबाबत योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. मराठा आरक्षणासाठी सरकारने प्रवेशप्रक्रिया स्थगित करत त्याबाबत अध्यादेश काढण्याची तयारी केल्याने खुल्या व अन्य समाजातील विद्यार्थ्यांनी त्याला जोरदार विरोध केला. प्रवेशप्रक्रिया स्थगित केल्यास आमचे प्रवेश वेळेत होणे शक्य नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.

सरकारने वैद्यकीय प्रवेश निश्चित करण्यासंदर्भात अध्यादेश काढणे म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान असल्याची प्रतिक्रिया नोंदवत खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी सरकारचा निषेध केला. सरकारकडून आमच्या प्रवेशाचे शुल्क भरण्याची तयारी दर्शवण्यात येत आहे, पण आमच्या प्रवेशाचे शुल्क भरण्याऐवजी सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरावे, असे सांगत आमचा मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध नाही, परंतु आमच्या मेरीटच्या जागा मराठा समाजाला देण्यात येत आहेत. हा एकप्रकारे मेरीटची हत्या करण्याचा प्रकार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनीही सरकारकडून शुल्काचे पैसे घेण्यास नकार दिला आहे. मग आम्ही का शुल्क घ्यावे असा प्रश्न उपस्थित केला. आम्हाला आमच्या हक्काच्या मेरीटनुसार मिळणार्‍या जागा हव्या आहेत. त्यासाठी आमचे हे आंदोलन आहे, असे डॉ. अभिषेक कोठारी यांनी सांगितले.

सरकारकडून मताची बेगमी करण्यासाठी मराठा समाजाला झुकते माप देण्यात येत असल्याचा आरोपही खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत विद्यार्थ्यानी सरकारचा निषेध करत कार्टर रोडवर आंदोलन केले, अशी माहिती डॉ. रजत अगरवाल यांनी दिली.