घरमहाराष्ट्रराज्यातील ४०० परिचारिकांचा 'काम बंद' आंदोलनाचा इशारा

राज्यातील ४०० परिचारिकांचा ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा

Subscribe

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील ४०० परिचारिका आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत. तसेच जर आमच्या मागण्या मान्य न केल्यास काम बंद आंदोलन करु असा इशारा परिचारीकांनी दिला आहे.

सातव्या वेतन आयोगातील त्रुटी आणि परिचारिका वर्गातील विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका आणि आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. आपल्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ४०० हून अधिक नर्सेस आझाद मैदानात उतरुन सरकारविरोधात निषेध व्यक्त करत आहेत. जर आता मागण्या मान्य होऊन त्यावर अंमलबजावणी झाली नाही तर येत्या मार्च महिन्यात तीन दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले जाईल असा इशारा ही नर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

नर्स या आरोग्य विभागाचा कणा

राज्यात डॉक्टरांची संख्या ५० टक्के अपुरी असून रुग्णसेवेचे काम परिचारिकांकडून करुन घेतले जाते. त्यामुळे, परिचारिकांना तेवढे वेतन दिले जावे, तसेच सातव्या वेतन आयोगातील त्रुटींमुळे अद्यापही परिचारिका संवर्गातील कर्मचारी हक्कावाचून दूर आहेत. त्यांना तो हक्क मिळावा या मुख्य मागणीसह अन्य बाबींची पूर्तता व्हावी यासाठी सकाळपासूनच या नर्स आझाद मैदानावर दाखल झाल्या आहेत. महाराष्ट्रात सुमारे २ लाख १९ हजार नर्स आहेत. नर्स या आरोग्य विभागाचा कणा असून यात बऱ्याच प्रमाणात महिला कर्मचारी आहेत. तसेच डॉक्टरांची अपुरी संख्या लक्षात घेता आरोग्य सेवेचा बराच भार या प्रवर्गावर पडत आहे.

- Advertisement -

याविषयी महाराष्ट्र राज्य परिचारीका आणि आरोग्य सेवा कर्मचारी संगठना समन्वय समितीचे प्रसिद्धी प्रमुख अजय क्षीरसागर यांनी सांगितलं, ‘या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून नर्स सहभागी झाले आहेत. जवळपास ४०० नर्स सहभागी झाल्या आहेत. हे काम बंद आंदोलन नाही त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झालेला नाही. या आंदोलनात रात्रपाळी करून आलेल्या आणि सुट्टी असलेल्या नर्स सहभागी आहेत. पण जर आज केलेल्या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर मार्च महिन्यात किमान तीन दिवसीय काम बंद आंदोलन करु. ज्याचा परिणाम नक्कीच रुग्णसेवेवर होऊ शकतो. या आंदोलनात जे.जे , सेंट जॉर्ज आणि जीटी या सरकारी रुग्णालयातील परिचारिका सहभागी आहेत’.

परिचारिकांवर अन्याय होतो

परिचारिकांवर सतत अन्याय होत आला आहे. त्यामुळे अनेक मागण्यांसाठी परिचारिका आंदोलन करत आहेत. सातवा वेतन आयोग लागू करावा, परिचारिकांसाठी स्वतंत्र संचालनालय, नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी भरती प्रक्रिया बंद करावी, शिवाय जी रिक्त पदे आहेत ती लवकरात लवकर भरावीत अशा अनेक मागण्यांसाठी परिचारिका आंदोलन करत आहेत. हे एक दिवसीय आंदोलन आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात काम बंद आंदोलन करु.  – प्रा. अरुण कदम, समन्वयक, समिती संघटना

- Advertisement -

नर्सेसच्या मागण्या

  • सातवा वेतन आयोग
  • स्वतंत्र संचलनालय उभारा
  • जुनी पेंशन योजना लागू करा
  • कंत्राटी भरती बंद करा
  • प्रशिक्षण संस्था प्राचार्य-उपप्राचार्य पदे निर्मित करा
  • सेवा अंतर्गत उच्चशिक्षणासाठी १ अध्ययन आणि १ प्रतिनियुक्ती रजा
  • आरोग्य बजेट वाढवा
  • समान काम समान दाम

या मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांची समितीने भेट घेतली. त्यांना समन्वय समितीने मागण्या वजा आंदोलन पत्र दिले आहे असं ही सांगण्यात आले आहे. पण यावर काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही.


हेही वाचा – ट्रामा केअर रुग्णालयातील तीन परिचारिका निलंबित

हेही वाचा – नायर रुग्णालयाच्या परिचारिकांचे काम बंद आंदोलन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -