भजीतून कांदा गुल, कोबीची मागणी फुल

कांद्यापेक्षाही पातीचा भाव !

Mumbai
health benefits of onion
कांदा

अवकाळी पावसामुळे एकीकडे भाज्यांचे दर कडाडले असतानाच कांद्याच्या वाढत्या दरानेदेखील सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांद्याचे दर कमी होण्याऐवजी वाढत जाऊन प्रति किलो ५५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तसेच महागड्या कांद्याचा दर्जाही ओलसर, काळपट आहे. त्यामुळे सर्वांना प्रिय असलेल्या कांदाभजीतून कांदा गायब झाला असून त्या जागी कोबीचा वापर केला जात आहे. इतकेच नव्हे तर कांद्यापेक्षा कांद्याची पात महाग झाली आहे.

कांद्याची कसर पातीची भाजी घेऊन काढावी तर ती सोयसुद्धा राहिली नाही. भाज्यांच्या वाढीव चढ्या दराची लागण कांद्याच्या पातीलाही झाल्याने 30 रुपयाला मिळणारी पात कांद्यापेक्षा अधिक ‘भाव’ खावू लागली आहे. पावसाचा गारवा पसरला असला तरी कांदाभजी खाण्याचे चोचले पुरविता येत नाहीत. कांदाभजीतून सध्या कांदा गुल झाला असून त्याची जागा कोबीने घेतली आहे. भरपूर कोबीमध्ये चवीला कांदा घालून भज्या तळण्याची हिकमत अनेक टपर्‍यांवर लढवली जात आहे. महागड्या भजीकडे हॉटेलांतून पाठ फिरवली जात आहे.

कांद्याचे पीक अमाप आल्याची सहा महिन्यांतील चर्चा फुसकी होती, असे आता बोलले जाऊ लागले आहे. घाऊक बाजारामध्ये थंडीच्या मोसमासाठी कांदा साठवून ठेवल्याने त्याला ओल धरत आहे. ओल लागलेला कांदाही चढ्या दरात विकला जात आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे. बाजारामध्ये नवीन कांदा आला असला तरी त्याचे प्रमाण कमी आहे, शिवाय यातील बराचसा कांदा ओल धरून नासला आहे. त्यामुळे ग्राहक हवालदिल झालेत. घाऊक बाजारात नवीन कांद्याला उठाव नसून जुन्या कांद्यालाच जास्त मागणी असल्याने त्याचे दर वाढले आहेत. नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्यासाठी आणखी १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे डिसेंबरपासून कांद्याचे दर खाली येण्याची शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली.

घरात सगळ्याच भाज्या कांदा, टोमॅटोचा वापर करून केल्या जातात. कांद्याला पर्याय कसा शोधायचा हे लक्षात येत नाही. कांदा नसेल तर चवीमध्येही फरक पडतोच. त्यामुळे महाग कांदा विकत घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
-जयश्री पाटील, गृहिणी

भाज्यांच्या किमती वाढत आहेत. त्यात आता कांद्याच्या दराचीही भर पडल्याने कोसळलेले किचनचे बजेट सांभाळायचे कसे, हा प्रश्न आहे.
-स्वागता पाटील, गृहिणी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here