विजेच्या लपंडावाने ऑनलाईन लेक्चरचा फज्जा

इंटरनेटचा स्पीड मंदावला; जिल्ह्यातील 650 विद्युत खांब कोसळले

mseb
MSEB

निसर्ग वादळाचा बुधवारी जिल्ह्यात जोरदार तडाखा बसल्याने शेतमालासह विजवितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात ठिकठिकाणी तब्बल 650 विद्युत खांब जमिनदोस्त झाल्याने गुरुवारी (दि.4) दिवसभर विजेचा लपंडाव सुरु होता. त्यामुळे ऑनलाईन लेक्चर, सभांचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे दिसून आले. अनेक शाळांनी तर आज ऑनलाईन शिकवणीला सुटी जाहीर केल्यामुळे नियोजनावर पाणी पडल्याचे दिसून आले.

जिल्ह्यातील नाशिक शहर व मालेगाव मंडळात जवळपास लघु व उच्च दाबाचे 650 पेक्षा जास्त वीज खांब कोसळले. यामध्ये 98 उपकेंद्रे आणि एक हजार 74 वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. काही भागात सुरक्षेसाठी विजपुरवठा बंद करावा लागला. गुरुवारी काही भागांमध्ये कमी दाबाने वीज पुरवठा सुरु झाला. त्यामुळे घरातील फॅन, टिव्ही, फ्रीज आदी उपकरणे बंद होती. विशेष म्हणजे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि कर्मचार्‍यांच्या दैनंदिन बैठकांवर झाला. इंटरनेटचा स्पीड अत्यंत कमी झाल्याने बहुतेक कर्मचार्‍यांना पूर्वनियोजित बैठक, मार्गदर्शन शिबीरावर पाणी सोडवा लागले. त्यामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली. शासकीय व खासगी कार्यालयांमधील इंटरनेटचा स्पीडही मंदावल्याने दुसर्‍या दिवशी कामकाज संथगतिने सुरु होते.

वारा व पावसाचा वेग ओसरताच गुरुवारी दुपारपर्यंत नाशिक शहरातील व जिल्ह्यातील बहुतांश वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळविले. मात्र ग्रामीण भागात व दुर्गम ठिकाणी काही ठिकाणी कार्यात अडथळे असल्याने तात्पुरता पुरवठा सुरू केला असून दुरुस्तीचे कार्य अजून सुरूच आहे. महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंते रमेश सानप आणि प्रविण दरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंते, अभियंते आणि जनमित्र सातत्याने कार्यरत आहेत.