घरट्रेंडिंगबकरी ईदसाठी आणलेले बकरे वेशीवरच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर वाढतोय दबाव

बकरी ईदसाठी आणलेले बकरे वेशीवरच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर वाढतोय दबाव

Subscribe

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांना केले होते. तसेच बकरे खरेदी करताना होणारी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन बकरे खरेदी आणि प्रतिकात्मक कुर्बानी करण्यास सांगितले आहे. मात्र अनेकांनी महाराष्ट्राच्या बाहेरून इतर राज्यातून ऑनलाईन बकरे खरेदी केल्यामुळे हे आणलेले हजारो बकरे राज्याच्या आणि मुंबईच्या वेशीवर आलेले आहेत. त्यांना राज्यात येण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मुस्लिम मौलवींसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून बकरी ईदला कुर्बानी देण्यास अडथळा आणल्यास आंदोलन करण्याचा ईशारा मुस्लिम नेत्यांकडून दिला जात आहे.

येत्या शनिवारी, १ ऑगस्ट रोजी बकरी ईद आहे. ही ईद घरीच साजरी करावी, जमल्यास प्रतिकात्मक कुर्बानी द्यावी, नमाजासाठी एकत्र येऊ नये, ऑनलाईन बकरे खरेदी करावेत, असे निर्देश राज्य सरकारने बकरी ईदनिमित्त मुस्लिम समाजाला दिले आहेत. पण बकरी ईदनिमित्ताने निर्बंध सैल करण्यात यावेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएम पक्षाचा दबाव होता. याबाबत दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मुस्लिम नेत्यांशी बैठक घेतली होती. या बैठकीला समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी आणि आमदार रईस शेखही उपस्थित होते. बैठकीनंतर दोन दिवसांवर आलेल्या बकरी ईदसाठी लॉकडाऊनच्या काळात शिथिलता देण्यात यावी अशी मागणी अनेक मुस्लिम आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे समजते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासाठी सर्वधर्म समभाव असल्याने केवळ बकरी ईदसाठी नियमात शिथिलता देण्यास नकार दिल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.

- Advertisement -

आषाढी वारी, दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत सरकारने निर्बंध लावलेले आहेत. सर्वधर्मसमभावानुसार, ईदसाठीही निर्बंध कायम राहतील, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या निकटवर्तीयांना सांगितल्याची माहिती आहे.

राज्य सरकारकडून बकरी ईदबाबत निर्बंध लागू करण्यात आले असताना अनेकांनी इतर राज्यातून अगदी थेट राजस्थान, हैद्राबाद, गुजरात मधूनही ऑनलाईन बकरे मागवले आहेत. हे बकरे घेऊन आलेले ट्रक राज्यातील विविध भागात वेशीवर येऊन थांबले आहेत. ऑनलाईन बकरे खरेदी करण्याचे निर्देश हे राज्यापुरते मर्यादीत असताना इतर राज्यातून बकरे मागवण्यात आल्यामुळे त्या गाड्यांना राज्यात प्रवेश करण्यास परवानगी नाही. या गाड्या सध्या वेशीवरच अडून आहेत. तसेच पोलिस एकावेळी केवळ दोनच बकरे नेण्यास परवानगी देत आहेत. त्यामुळे बकऱ्यांची वाहतूक करणाऱ्यांना नाहक त्रास होत असल्याचा आरोप मौलवींनी केला आहे.

- Advertisement -

बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत. त्यामुळे सण साजरा करणे कठीण झाले आहे,’ असा आरोप मुंबईतील मुस्लिम मौलवी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ही अडवणूक न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मौलवींची बुधवारी व्हर्च्युअल बैठक झाली. यावेळी राज्यातील सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. या सरकारने मुस्लिम समाजाची निराशा केली आहे,’ असा आरोप बैठकीत करण्यात आला. ’बकरी घेऊन येणारी वाहने चेकनाक्यांवर अडवली जात आहेत. एकावेळी दोनच बकर्‍यांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होत आहे, असा मुद्दाही मौलानांनी मांडला.

मुस्लिम आमदार व मंत्र्यांवर आम्हाला विश्वास होता. हे आमदार व मंत्री सरकारला बकरी ईदसाठी सुधारीत नियमावली जारी करण्यास भाग पाडतील, असे वाटत होते. त्यांनी तसे बरेच प्रयत्न केले. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासाठी मध्यस्थी केली. त्यानंतरही मुस्लिम समाजाला दिलासा मिळाला नाही, असे ऑल इंडिया उलेमा कौन्सिलचे मौलाना मसूद दरयाबादी यांनी सांगितले. ईस्लाममध्ये प्रतिकात्मक कुर्बानीची संकल्पना नाही. ऑनलाईन बकरे विकत घेण्यातही अडचणी येत आहेत. देवनारच्या कत्तलखान्यात रोज म्हशी कापल्या जातात पण कुर्बानीसाठी म्हशी कापण्यास परवानगी नाही हा कुठला नियम आहे असा सवाल माजी मंत्री नसीम खान यांनी केला आहे. यापूर्वी मुस्लिम एनजीओ, मौलाना आणि आमदारांची बैठक घेतली जायची. पण ठाकरे सरकारने अधिकृत अशी कोणतीही बैठक घेतली नाही असा आरोप फरीद शेख यांनी केला आहे. एकुणच महाविकास आघाडी सरकारने आमचा अपेक्षाभंग केला असून बकऱ्यांची कुर्बानी देण्यास अडथळा आणल्यास आम्ही आंदोलन करू असा ईशाला मुस्लिम कार्यकर्ते आणि मौलाना यांनी दिला आहे.

अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक मंडळाचे हैदर आझम यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. ’मुस्लिम मंत्री आणि आमदार सरकारकडे आपली भूमिका पोहोचवण्यात अपयशी ठरले आहेत,’ अशी टीका भाजपच्या मुस्लिम नेत्यांनी केली आहे.

बकरी ईद दोन दिवसांवर आली आहे. आज हजारो बोकड राज्याच्या आणि मुंबईच्या वेशीवर अडकले आहेत. त्यातील शेकडो बोकड दगावले आहेत. सरकार काय तमाशा बघते आहे का?
-नसीम खान, उपाध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -