Friday, August 7, 2020
Mumbai
28.8 C
घर ताज्या घडामोडी ‘शाकाहारी हॉटेलपेक्षा परमिट रुम चांगलं’ मंत्री गुलाबराव पाटलांचा तरुणांना सल्ला

‘शाकाहारी हॉटेलपेक्षा परमिट रुम चांगलं’ मंत्री गुलाबराव पाटलांचा तरुणांना सल्ला

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा अजब सल्ला....

Jalgaon
Gulabrao Patil
गुलाबराव पाटील; पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री

शिवसेनेचे नेते आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना एक धक्कादायक विधान केले आहे. तरुणांनी व्यवसायात उतरुन स्वतःची प्रगती करावी, हे समजवून सांगण्यासाठी गुलाबराव पाटील यांनी स्वतःच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला. “विद्यार्थी असताना मी शाकाहारी हॉटेल सुरु केले होते. मात्र हॉटेलात ग्राहक येण्यासाठी नंतर ते मांसाहारी केले. त्यानंतर हॉटेलचे परमिट रुममध्ये रुपांतर केल्यानंतर हॉटेल अधिक चालायला लागले.” हे सांगताना गुलाबराव पाटील यांनी परमिट रुम आणि दारुच्या दुकानाचे समर्थन केले.

जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत विविध शासकीय योजनांबद्दल जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील उपस्थित होते. तरुणांनी व्यवसायात उतरण्यासंबंधी पाटील सांगत होते. “मी शाकाहारी हॉटेल विकत घेतले होते. मात्र ते चालतच नव्हते. मग त्याला मांसाहारी केले. पण तरिही हॉटेल चालत नव्हते. मटण दुसऱ्या दिवशी तसंच राहायचं. मग आम्ही परमिट रुम सुरु केले आणि लगेच आमचा दिवसाला २० हजारापर्यंत धंदा व्हायला लागला.”

हे वाचा – “इंदुरीकर महाराजांमध्ये विकृत लक्षणे दिसतात, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा”

“परमिटचा व्यवसाय मध्यतंरी चालत नव्हता. मग एकाने मला सल्ला दिला की दारू देखील हॉटेलमध्ये द्यायला सुरु करा. पण राजकारणात असल्यामुळे दारू कशी विकायची? असा प्रश्न माझ्या मनात आला. मात्र मी नाही तर कुणीतरी हा व्यवसाय करणार आहेच? हा विचार करुन हॉटेलवर दारू देखील विकायला सुरुवात केली. आता माझा व्यवसाय जोरात सुरु आहे.”, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

“मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन तरुणांनी व्यवसाय सुरु केला पाहीजे. चिकाटी ठेवून व्यवसाय तडीस नेला पाहीजे. कोणतेही काम छोट न मानता स्वतःला त्यात झोकून दिले पाहीजे, म्हणजे यश मिळते”, असे देखील गुलाबराव पाटील म्हणाले.