घरमहाराष्ट्रविरोधकांनी कांजूर मेट्रो कारशेड राजकीय विषय केला, त्यात न्यायालयाने पडू नये -...

विरोधकांनी कांजूर मेट्रो कारशेड राजकीय विषय केला, त्यात न्यायालयाने पडू नये – संजय राऊत

Subscribe

महाराष्ट्रातील विकासकामं रोखण्यासाठी न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग

आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरुन ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार धक्का देत कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यावर बोलताना शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेड राजकीय विषय केला असून त्यात न्यायालयाने पडू नये, असे म्हटले आहे. जमीन महाराष्ट्राची आहे, हे सरकार महाराष्ट्राचे आहे. आता हे मिठागरवाले आले कुठून? असा सवाल देखील राऊतांनी केला. न्यायालय हल्ली कशातही पडते. महाराष्ट्रातील विकासकामे रोखण्यासाठी न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग केला जात असल्याचे म्हणत संजय राऊतांनी निशाणा साधला.

“प्रकाश आंबेडकरांचे एक विधान फार महत्त्वाचे आहे, त्याबाबत त्यांचे अभिनंदन. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला विरोधी पक्षाने राजकीय विषय केला आहे. त्यात न्यायालयाने पडू नये. जमीन महाराष्ट्राची आहे, हे सरकार महाराष्ट्राचे आहे, आता मीठागरवाले आलेत कुठून, न्यायालय यात कशासाठी पडते आहे,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली. पुढे बोलताना राऊत म्हणाले, “न्यायालय हल्ली कशातही पडते. खालच्या न्यायालयाला डावलून वरचे न्यायालय जामिन देते. एका खूनी माणसाला. किंवा कोणाचे बेकायदा बांधकाम तोडण्यासंदर्भात सरकारने कारवाई केली तर सरकारलाच बेकायदेशीर ठरवते. या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये असे कधी पाहिले नव्हते.”

- Advertisement -

“कांजुरच्या जागी कोणी राजकारणी बंगले, फार्महाऊस बांधणार नाहीत, हा मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाच्या विकासाचा विषय आहे. त्यावर अशा प्रकारे निर्णय येणे दुर्दैव आहे. याच जमिनीवर पूर्वीचे सरकार पोलीस आणि दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प राबवणार होते, म्हणजे जमिन सरकारचीच आहे ना? मुळात अशाप्रकारच्या प्रकल्पांना विलंब करायचा. लोकांमध्ये रोष निर्माण करायचा. लोकांच्या अडचणीत वाढ निर्माण करायची. सरकारला बदनाम करायचे. यामुळे नुकसान महाराष्ट्राचे होत आहे. जनतेवर आर्थिक बोजा पडतोय,” असे संजय राऊत म्हणाले.

“ज्या गोष्टीत न्यायालयाने पडायला हवे, न्याय द्यायला हवा, अशी असंख्य प्रकरणे देशात पडली आहेत. तिथे लोक तारीख पे तारीख करुन झिजत आहेत. पंजाबमधील शेतकरी आत्महत्या करत आहेत, काल एका संताने आत्महत्या केली आहे. न्यायालयाने आणि केंद्र सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे, केंद्र सरकारला निर्देश दिले पाहिजेत. पण महाराष्ट्रातील सरकार भाजपचे नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का, अशा शंका सध्या लोकांच्या मनात येत आहेत,” असे संजय राऊत यांनी म्हटले.

आरेचं जंगल वाचवणं यात कुठला अहंकार हे तर राष्ट्रीय कर्तव्य

आरेचं जंगल वाचवणे यात कुठला अहंकार? हे तर राष्ट्रीय कर्तव्य, हा तर केंद्र सरकारचाच कार्यक्रम, वाघ वाचवा, नदी वाचवा, जंगल वाचवा, हा मोदी सरकारचा कार्यक्रम आहे. ही लढाई सुरुच राहील. महाष्ट्रात सरकार आले नाही याचे राजकीय दु:ख मी समजू शकतो. पण अशा प्रकारे केंद्राच्या अखत्यारीतील यंत्रणा हाताशी धरुन महाराष्ट्राला त्रास देणे, जनतेचा छळ करणे हे फार काळ चालणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -