घरमहाराष्ट्रचहापानावर विरोधकांचा बहिष्कार

चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

Subscribe

सध्याचे सरकार, हे स्थगिती सरकार -फडणवीस

सध्याचे सरकार हे स्थगिती सरकार आहे. हे सरकार प्रत्येक गोष्टींला स्थगिती देत आहे. त्यामुळे महाराष्ट्र ठप्प पडला असल्याचा घणाघात रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केला. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून जे बसले आहेत त्यांच्यासोबत चहा घेण्यात आम्हाला रस नसल्याचे सांगत फडणवीस यांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यावेळी जाहीर केला.

नागपूर येथे सोमवारपासून सुरु होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी विरोधी पक्षांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारचा शपथविधी होऊन अनेक दिवस लोटले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. तीन पक्षातील विसंवादामुळे खातेवाटप अंतिम नाही. सध्या जे खातवाटप झाले आहे ते अंतिम नाही, असे स्वतः ज्येष्ठ मंत्री ट्विट करून सांगतायत. त्यामुळे प्रश्न कुणाला विचारणार? मध्यंतरी पुरेसा वेळ असतानाही अंतिम खातेवाटप झालेले नाही.

- Advertisement -

त्यामुळे या सरकारला नागपूरचे अधिवेशन ‘सीरियस’ अधिवेशन वाटत नाही. वेळकाढूपणा करण्यासाठी कागदोपत्री अधिवेशन घेतले जात आहे, असल्याच आरोप त्यांनी केला.ते पुढे म्हणाले की, सरकार आल्यावर अवकाळीग्रस्त शेतकर्‍याला मदत मिळेल अशी अपेक्षा होती. आम्ही काळजीवाहू सरकार असताना दहा हजार कोटीची तरतूद केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः हेक्टरी २५ हजार आणि फलबागांना सरसकट ५० हजार देण्याची मागणी केली होती. पण, इतक्या बैठकांनंतरही शेतकर्‍यांना मदतीची घोषणा झाली नाही. आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर साधी चर्चा देखील करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ९३ लक्ष हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सरकारने स्वतःचाच शब्द पाळायला हवा. उद्धव ठाकरे यांची मागणी पूर्ण करायची असेल तर शेतकरीसाठी २३ हजार कोटी रूपये तातडीने निधी वितरीत करा अथवा त्याचा कार्यक्रम तरी जाहीर करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केला.

या सरकारमधील तिन्ही पक्षांनी त्यांच्या किमान समान कार्यक्रम जाहीर करताना शेतकर्‍यांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या. तर सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा हे कधी होणार याचा कार्यक्रम जाहीर करायला हवा. या सर्व आमच्या मागण्या नाहीत तर त्यांनी केलेल्या मागण्या आश्वासने आहेत. त्यांना यांचा विसर पडू नये यासाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांना आठवण करून देऊ, असे फडणवीसांनी यावेळी ठणकावून सांगितले.

- Advertisement -

राहुल गांधींसह शिवसेनेवर निशाणा
शिवसेनेवर हल्लाबोल करताना सत्तेसाठी अजून किती लाचारी पत्करणार अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली. सावरकर आणि त्यांच्या कुटुंबाचा त्याग राहुल गांधी यांनी पहिला नाही. शिवसेनेला सावरकरांचा जाज्वल्य अभिमान वाटत होता. हा जाज्वल्य अभिमान सौदेबाजीत अडकला आहे. सावरकरांचा अभिमान बाळगावाच लागेल. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी ताबडतोब माफी मागावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -