घरमहाराष्ट्रआपसांत ताळमेळ बसवा; मगच चहापानाला बोलवा

आपसांत ताळमेळ बसवा; मगच चहापानाला बोलवा

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, विरोधक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येपासूनच आक्रमक झाले आहेत. आक्रमक असलेल्या विरोधकांनी सत्ताधार्‍यांच्या चहापानावर बहिष्कार घालत या सरकारने अगोदर आपापसात चहापान करून ताळमेळ बसवावा आणि नंतरच आम्हाला चहापानाला बोलवावे असे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सरकार या अधिवेशनाच्या माध्यमातून करते. मात्र, या सरकारला अजूनही सूर गवसलेला नाही. त्यांची दिशाही ठरलेली नाही. हे सरकार गोंधळलेल्या परिस्थितीत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. शेतकरी कर्जमाफीवरून या सरकारने घुमजाव केला असून, आम्ही कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांना ज्या अटी घातल्या होत्या त्यापेक्षा जाचक अटी या सरकारने घातल्याची टीका देखील फडणवीस यांनी यावेळी केली. एवढेच नाही तर सातारा, सांगली, कोल्हापूर येथील शेतकर्‍यांना आम्ही जी कर्जमाफी दिली त्या व्यतिरिक्त हे सरकार काहीही देणार नसल्याचे सांगत आम्ही अधिवेशनात शेतकर्‍यांबद्दल आवाज उठवणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

महिला अत्याचाराबाबत देखील हे सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत पोलिसांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याची टीकादेखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. फडणवीस सरकारच्या काळात ज्या योजना सुरू करण्यात आल्या त्या योजनांना स्थगिती देण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप करत मराठा आरक्षण, वॉटर ग्रीड प्रश्न, ग्राम सडक योजनेला दिलेली स्थगिती, जलयुक्त शिवार योजनेला दिलेली स्थगिती यावर आम्ही सभागृहात आवाज उठवणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आमची खुशाल चौकशी करा
फडणवीस सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार तसेच वृक्ष लागवड यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सत्ताधारी करत असून, ठाकरे सरकार याची चौकशी करणार अशी चर्चा सुरू आहे. त्यावर फडणवीस म्हणाले की, आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. आमच्या सरकारच्या काळात वृक्ष लागवडीत आणि जलआयुक्त शिवारात ही महत्त्वाची कामे झाली आहेत. त्याची खुशाल चौकशी करा. राज्य सरकारला त्याबाबत श्वेतपत्रिका काढायची असेल तर त्यांनी ती खुशाल काढावी. जर श्वेतपत्रिका काढायची झाली तर ती 1999 पासून 2015 पर्यंत काढावी, ही आमची मागणी आहे. प्रत्येक 5 वर्षांनी श्वेतपत्रिका काढण्यात यावी, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

प्रवीण दरेकर गप्प
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेला फक्त विधान सभेच्या विरोधी पक्षनेत्यांनीच पत्रकारांशी संवाद साधत विरोधी पक्षाची भूमिका मांडली. मात्र, या पत्रकार परिषदेला उपस्थित असेलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मात्र गप्प होते. तसेच या पत्रकार परिषदेला रासमचे महादेव जाणकर, तसेच आरपीआयने दांडी मारली. रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत उशिरा पोहोचले. त्यामुळे विरोधकांमध्ये ताळमेळ नाही की काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

सावरकरांचा अपमान करणारी काँग्रेस शिवसेनेला चालते का?
काँग्रेसचे पाक्षिक शिदोरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्यात आला, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ताशेरे ओढत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारी काँग्रेस शिवसेनेला चालते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येत्या 26 फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव विधिमंडळात झाला पाहिजे ही आमची मागणी असणार आहे. एवढेच नाही तर प्रभू रामाचा जन्म अयोध्येत झाला होता याचे पुरावे काँग्रेसने मागितले आहेत, तर दुसरीकडे छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे शिवसेना मागत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्र्यांचे आभार
एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे दिल्याबद्दल तसेच सीएए, एनपीआर कायद्याला पाठिंबा दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर आभार मानले. जनगणनेसंदर्भातील एनपीआर हा केंद्र सरकारचा कायदा आहे. या कायद्यात कोणी हलगर्जीपणा करू शकत नाही. एनपीआरची सुरुवात देशात २०११ साली झालेली आहे, तर सीएए कायद्यामुळे नागरिकत्व मिळणार आहे, ते जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -