घरमहाराष्ट्रअवयव दान चळवळीचे फलित; शेतकरी दाम्पत्याने घातले जिवंतपणी श्राद्ध

अवयव दान चळवळीचे फलित; शेतकरी दाम्पत्याने घातले जिवंतपणी श्राद्ध

Subscribe

एका सधन शेतकरी दाम्पत्याने जिवंतपणीच स्वतःचे श्राद्ध घालून आपला देहदान केल्याची अभूतपूर्व घटना घडली आहे. मृत्यूनंतर अमूल्य असे अवयव आगीत भस्म केले जातात. तेच मृत्यूनंतर दान केले तर अनेकांना जीवदान मिळेल या भावनेतून ही संकल्पना आकाराला आली.

अंमळनेरमधील एका सधन शेतकरी दाम्पत्याने जिवंतपणीच स्वतःचे श्राद्ध घालून आपला देहदान केल्याची अभूतपूर्व घटना घडली आहे. अवयवदान चळवळीचे प्रमुख पुरुषोत्तम पाटील यांच्या कार्याचे हे फलित असल्याचे उघड झाले आहे.
मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना त्याच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने काढून घेतले जातात. मात्र,अमूल्य असे अवयवरुपी दागिने आगीत भस्म केले जातात. ते मृत्यूनंतर दान केले तर अनेक लोकांना जीवदान मिळेल. या भावनेतून वसईतील पुरुषोत्तम पवार-पाटील देहदान, अवयवदान चळवळ चालवत आहेत. या चळवळीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मुंबई ते गोवा अशी पदयात्राही केली होती. अनेक ठिकाणी त्यांनी अवयवदानाचा प्रचारही केला होता. त्यांच्याच संकल्पनेतून अंमळनेरमध्ये जिवंतपणी श्राद्ध साकारले. या अभिनव संकल्पनेमुळे आयुष्यच बदलून गेले, अशी प्रतिक्रिया भाऊसाहेबांनी दिली.

जिवंतपणी श्राद्ध घालण्याची संकल्पना

अंमळनेर-अंमळगांवातील भाऊसाहेब उर्फ कृष्णराव महारु पाटील हे समृद्ध, सधन शेतकरी म्हणून परिचित आहेत. भाऊसाहेब (वय ८६) आणि त्यांच्या सौभाग्यवती हिराबाई (८१) या आपले उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने घालवत होते. वसईतील एक नावाजलेले उद्योजक पुरुषोत्तम पाटील हे त्यांचे मधले जावई. अचानक एक दिवशी भाऊसाहेब गेले, असा संदेश त्यांनी नातलगांना पाठवला. त्यावर कधी गेले? बॉडी कधी उचलणार? आम्ही येईपर्यंत बॉडी ठेवणार का ? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे सव्वा सहा फूट उंचीच्या धडधाकट भाऊसाहेबांची त्यांच्या कथित जाण्यामुळे बॉडी झाली.
ही बाब पाटील यांनी जिवंत असलेल्या भाऊसाहेबांच्या निदर्शनास आणून दिली. तुम्ही गेल्यानंतर सर्व नातलग, हितचिंतक तुमची बॉडी बघायला येतील. त्यात प्रेमापोटी येणारे आणि लोकलाजेस्तव आलेले लोकही असतील. तुमच्यावर अंत्यसंस्कार कधी होतात आणि आमची सुटका कधी होते, अशी तगमग त्यांना लागून राहील. त्यावेळी कोण-कोण आले आहे हे तुम्हाला पाहता येणार नाही. तुमच्या तेराव्याला येऊन कोणीही जेवणार नाही आणि त्यानंतर तर तुमची आठवणही उरणार नाही, अशी जाणीव भाऊसाहेबांना करून देण्यात आली. त्यातूनच जिवंतपणी श्राद्ध घालण्याची संकल्पना आकाराला आली.

- Advertisement -

साक्षात स्वर्ग दर्शन सोहळा

भाऊसाहेबांना भेटायला शेवटची संधी, अंतिम मुखदर्शन, असा संदेश देवून त्यांच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले. १६ डिसेंबर २०१७ ला हा सोहळा संपन्न झाला. तत्पूर्वी आठवडाभर भजन-किर्तन, सत्संग असे अध्यात्मिक कार्यक्रम करण्यात आले. साक्षात स्वर्ग दर्शन सोहळा असे त्याला नाव देण्यात आले. एका मोठ्या सभागृहात भाऊसाहेबांना मानणारे, त्यांचे मित्र,नातलग,नातवंडे गोळा झाली. शहनाई वादनाने या सोहळ्याला सुरुवात झाली. दिवसभर भाऊसाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांचे भले-बुरे किस्से सांगण्यात आले. त्यांचा दरारा, आदरयुक्त भिती, ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आले. भाऊसाहेबांची जिवंतपणी चौकशी करण्यात आली. त्यांच्या पश्चात शोकसंदेश देण्याऐवजी त्यांच्यासमोर शुभसंदेश देण्यात आले. त्यांच्यासोबत स्नेहभोजन करण्यात आले. यावेळी भाऊसाहेबांनी सर्वांना आग्रह करून वाढले, तर काहींनी त्यांना स्वतःच्या हाताने भरवले.

देहदानाची घोषणा

त्यानंतर भाऊसाहेबांनी देहदानाची घोषणा केली. माझ्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार होणार नाहीत. माती सावरणे, अस्थी गोळा, विसर्जन करणे, ब्राम्हण भोज, गावजेवण केले जाणार नाही. त्यामुळे कोणालाही यावे लागणार नाही. निधनाची माहिती कळवण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. तसेच देहदानामुळे हा सोहळा पहायला मिळाला. आयुष्य बदलून गेले, असे भावोद्गार भाऊसाहेबांनी काढले. आता भाऊ साहेब एक वेगळे आयुष्य जगत आहेत. स्वतःची शेती विकून ते आपल्या अर्धांगिनीसह भारतभर भ्रमण करीत आहेत. देवदर्शन, सामाजिक कार्य, देहदान, अवयनदानाचे महत्व ते सर्वांना पटवून देत आहेत.

- Advertisement -

-रविंद्र माने

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -